साध्वी प्रज्ञासिंहांना ‘ते’ विधान भोवले; निवडणूक आयोगाची नोटीस

0

नवी दिल्ली: २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. साध्वी प्रज्ञा भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्याविरोधात त्या निवडणूक लढविता आहेत.

जिल्हा निवडणूक अधिकारी आणि भोपाळचे जिल्हाधिकारी सुदाम खाडे यांनी आम्ही या विधानाची स्वतः खात्री करुन घेतली आहे. तसेच या प्रकरणी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजक आणि साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याविरोधात आम्ही कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. यावर २४ तासांत त्यांना उत्तर द्यायचे आहे. सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांचा हा अहवाल आम्ही निवडणूक आयोगाकडेही पाठवणार आहोत असे सांगितले आहे.

आचारसंहिता लागू असताना या कार्यक्रमाच्या आयोजकांनी काही अटींवर कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात आली होती. गुरुवारी संध्याकाळी भोपाळ उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत मुंबई एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांच्यावर आरोप करताना त्यांनी तुरुंगात आपल्याला त्रास दिल्याचा गंभीर आरोप स्वाध्वी प्रज्ञा सिंहने केला होता. करकरेंचा सर्वनाश होवो असा शाप मी दिला होता. त्यानंतर सव्वा महिन्यानंतर करकरेंना दहशतवाद्यांनी ठार केले, असे विधान त्यांनी केले होते. या विधानानंतर चौफेर टीका झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आपले विधान मागे घेतले होते तसेच माफीही मागितली आहे.