साध्वी प्रज्ञा महान संत: उमा भारती

0

भोपाळ: भोपाळ मतदारसंघातून भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी कौतुक करत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

मध्य प्रदेशच्या राजकारणात तुमची जागा आता साध्वी प्रज्ञा घेणार का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता उमा भारती यांनी या प्रश्नाचे थेट उत्तर न देता साध्वी प्रज्ञाची तोंडभरून स्तुती केली. ‘साध्वी प्रज्ञा महान संत आहेत. त्यांच्याशी माझी तुलना करू नका. मी अगदीच सर्वसाधारण व्यक्ती आणि मूर्ख प्राणी आहे’, असे विधान उमा यांनी केले. मध्य प्रदेशातील काँग्रेसचं १० वर्षांचं दिग्विजय सरकार साध्वी उमा भारती यांच्या बळावरच भाजपने उलथवले होते. डिसेंबर २००३ मध्ये झालेल्या निवडणुकीत उमा यांच्या नेतृत्वाखाली भाजने बहुमताने काँग्रेसला मात दिली होती. त्यानंतर दिग्विजय सिंह यांनी सक्रिय राजकारणातून १० वर्षे संन्यास घेतला होता. उमा मुख्यमंत्री बनल्या पण अवघ्या आठच महिन्यांत त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर बाबुलाल गौर आणि शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा वाहिली. सलग १५ वर्षे भाजपने मध्य प्रदेशवर राज्य केल्यानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा मध्य प्रदेशची सत्ता भाजपकडून खेचून घेतली आहे. सध्या कमलनाथ राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशात भविष्यातील गणितं डोळ्यापुढे ठेवून भाजपने उमा यांच्याऐवजी प्रज्ञासिंह ठाकूर या साध्वीला आखाड्यात उतरवले आहे का, असा प्रश्न चर्चिला जात आहे. त्यामुळेच उमा यांच्या ताज्या विधानालाही विशेष महत्त्व आहे.