सानपाडा येथील महात्मा फुले चॅरिटेबल हॉस्पिटलचे उद्घाटन!

0

नवी मुंबई । आधुनिक उपचारासाठी हॉस्पिटल सोबतच सेवाभाव महत्त्वाचा आहे. कॅन्सर उपचारासाठी अत्याधुनिक उपचार केंद्र महाराष्ट्रात ठिकठिकाणी उभे राहणे आवश्यक आहे. नवी मुंबईमधील महात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्टच्या या हॉस्पिटलमधून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत उपचार केले जाणार आहेत. या हॉस्पिटलमधून दररोज एका मुलाला मोफत उपचार केले जाणार आहे. ही महत्त्वाची बाब आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कॅन्सरच्या अत्याधुनिक उपचाराची सोय
नवी मुंबई सानपाडा येथे आज महात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्टच्या हॉस्पिटल उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यवस्थापकीय विश्‍वस्त डॉ. प्रिन्स सुराणा यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. महात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्टच्या या हॉस्पिटलमध्ये 100 बेडची सोय असून अत्याधुनिक उपचार यंत्रांनी सज्ज आहे. या 12 मजली हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या अत्याधुनिक उपचाराची सोय आहे. दरमहा तीस मुलांना मोफत उपचार या हॉस्पिटलमधून होणार आहेत. जगात उपलब्ध असणारे अत्याधुनिक यंत्रणा येथे आहे. उपचारासाठी नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.

राज्यशासन सहकार्य करणार
आधुनिक कॅन्सर हॉस्पिटल सुरू केले ही चांगली बाब आहे. सेवेचा भाव यात आहे. हजारो लोक राज्यात सेवाकार्यात आले आहेत. जैन संतांचे तेज लोकांच्या सेवा कार्यासाठी प्रेरणा देणारे आहे. हॉस्पिटलमध्ये चांगले व आधुनिक उपचार येथे मिळतील. या हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे आणि उपचारासाठी केवळ 50 टक्के रक्कम द्यावी लागेल. कॅन्सर हा आजार गरीब, श्रीमंत पाहत नाही तो कोणालाही होतो. त्यावर उपचार महागडे आहेत. लोकांना आर्थिक व शारीरिक त्रास मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागतो. म्हणून असे केंद्र अनेक ठिकाणी सुरू होणे आवश्यक आहे. राज्यशासन अशा हॉस्पिटलसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.