केळीचे पैने न दिल्याने शेतकर्यांचा संताप : पोलिसांच्या हस्तक्षेपाने वादावर वेळीच नियंत्रण
रावेर- गायीका, बांधकाम व्यावसायीक व केळी व्यवसायात पर्दापण केलेल्या भुसावळातील सानिया कादरीविरुद्ध रावेर न्यायालयात धनादेश अनादर प्रकरणात खटले दाखल झाल्यानंतर ती कुटुंबियांसह शुक्रवारी दुपारी चार वाजता हजर झाल्यानंतर न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरच ऐनपूर परीसरातील शेतकर्यांनी तिला घेराव घालत जाब विचारला. आमच्या केळीचे पेमेंट देणार कधी? असा संतप्त सवाल ऐनपूर परीसरातील शेतकर्यांनी उपस्थित केला. याप्रसंगी सानियाची गाडीदेखील अडवण्यात आल्याने न्यायालयात बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी वाद मिटवला. न्यायालयीन तारखेसाठी सानिया आली असून याबाबत काय निर्णय होतो? याकडे लक्ष लागले आहे.
शेतकर्यांच्या उद्रेकानंतर भुसावळ सोडले
बांधकाम क्षेत्रात पदार्पण केलेल्या सानियाने अचानक केळी व्यवसायात उडी घेत रावेर व यावल तालुक्यातील शेतकर्यांची मोठ्या प्रमाणावर केळी खरेदी केली. त्या मोबदल्यात शेतकर्यांना धनादेश दिले मात्र दिलेल्या तारखेला हे धनादेश न वटल्याने ऐनपूर परीसरातील शेतकर्यांनी भुसावळातील जामनेर रोडवरील कृष्णकुंज या निवासस्थान येत उद्रेकही केला होता. या प्रकरणी गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होत मात्र या प्रकारानंतर सानियाने शहर सोडले होते. रावेर तालुक्यातील पोलिस ठाण्यांमध्ये तिच्याविरुद्ध फसवणुकीचेही गुन्हे दाखल आहेत. शेतकर्यांच्या आगामी भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.