साफसफाईच्या एकमुस्त ठेक्यावरुन महासभेत गदारोळ

0

नितीन लढ्ढा, कैलास सोनवणे यांनी मांडली लक्षवेधी, ठेका रद्दची सेनेची मागणी

जळगाव– महानगरपालिकेने शहरातील साफसफाईसाठी वॉटर ग्रेस या कंपनीला ठेका दिला आहे.परंतु साफसफाईबाबत नागरिकांच्या तक्रारीमुळे सभागृहात नाराजी व्यक्त करण्यात आली.शहरातील साफसफाईची विदारक स्थिती असल्यामुळे तसेच अटी-शर्तीचे भंग होत असल्यामुळे साफसफाईचा एकमुस्त ठेका रद्द करावा अशी जोरदार मागणी नितीन लढ्ढा यांनी लक्षवेधी मांडताना केली. तसेच कैलास सोनवणे यांनीही लक्षवेधी मांडताना मक्तेदाराची चूक असून तक्रारींमध्ये तथ्य असले तरी मक्तेदाराला संधी देण्याची भूमिका मांडली. यावर शिवसेनेच्या नगरसेवकांनी संधी देण्यास विरोध करुन ठेका रद्द करण्याची मागणी केली.त्यामुळे शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली.
मनपाची महासभा महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर अश्‍विन सोनवणे,आयुक्त उदय टेकाळे, नगरसचिव सुनिल गोराणे उपस्थित होते. सभेला सुरवात होताच नितीन लढ्ढा आणि कैलास सोनवणे यांनी साफसफाईच्या मांडलेल्या लक्षवेधीवर चर्चा करण्यात आली÷. महासभेत आयत्यावेळेसह 13 विषयांना मंजुरी देण्यात आली.कालिंका माता मंदिर ते बांभोरी पुलापर्यंत हायमस्ट दिवे लावण्याचा अमर जैन यांनी दिलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

भाजप- शिवसेना नगरसेवकांमध्ये खडाजंगी
साफसफाईच्या मुद्दयावर भाजप आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये सभागृहात चांगलीच खडाजंगी झाली. साफसफाई होत नसतांना तसेच पाच वर्षासाठी ठेका दिला आहे.त्यामुळे हा ठेका रद्द करावा अशी मागणी नितीन लढ्ढा,सुनिल महाजन, विष्णू भंगाळे,बंटी जोशी, नितीन बरडे,इबा पटेल,अमर जैन,प्रशांत नाईक यांनी मागणी केली.या मागणीला भगत बालाणी,कैलास सोनवणे,सुनिल खडके यांच्यासह भाजपाच्या नगरसेवकांनी विरोध केला. तसेच भगत बालाणी यांनी अमर जैन यांना हातवारे करुन अयोग्य वर्तणूक केल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी संताप व्यक्त केला.

मक्तेदाराची चूक झाली असल्याची कैलास सोनवणेंची कबुली
साफसफाईच्या प्राप्त तक्रारींमध्ये सत्यता असल्याची कबुली भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सभागृहात दिली. मक्तेदाराची चूक झाली आहे.समन्वयाचा अभाव आहे.मक्तेदाराने अटी-शर्तींचे भंग केले आहे. परंतु ठेका सुरु होवून 15 दिवसच झाले आहेत. त्यांना संधी दिली पाहिजे. पाघंरुन घालण्याचा प्रयत्न आमही करणार नाही असे म्हणत कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार प्रतिदिन 489 रुपये वेतन देण्याची मागणी कैलास सोनवणे यांनी यावेळी केली.

आरोग्य व्यवस्था क्रिप्टो करन्सी सारखी-नितीन लढ्ढा
शहरात साफसफाईची विदारक स्थिती आहे. साफसफाईसाठी ठेका देवून सुध्दा साफसफाई होताना दिसत नाही. पंतप्रधान आले आणि प्रभाग पाच मध्ये भेट दिली तर ते म्हणतील की,‘कुठे नेवून ठेवलाय माझा भारत’ अशा शब्दात नितीन लढ्ढा यांनी खंत व्यक्त करत शहरातील आरोग्य व्यवस्था ही ‘क्रिप्टो करन्सी’सारखी असल्याची त्यांनी टीका केली.तर विष्णू भंगाळे यांनी ठेकेदाराला नाशिक मनपाने काळ्या यादीत टाकले असल्याचे निदर्शनास आणून दिले. ठेकेदार अशाच प्रकारे वागत असेल तर जबाबदार कोण राहिल असा सवाल उपस्थित करीत मक्ता रद्दची भंगाळे यांनी मागणी केली. ठेकेदाराचे काही लोकं माझ्याकडे आले आणि 3 टक्क्याप्रमाणे पार्टनर होता का? अशी विचारणा केल्याचा गौप्यस्फोट नितीन बरडे यांनी केला.

..तर अधिकार्‍यांवर कारवाई-आयुक्त
यापूर्वीचे ठेके बंद करुन एकमुस्त ठेका दिला आहे. 15 दिवसाच्या कामातच निष्कर्ष काढून टोकाची भूमिका घेता येणार नाही.साफसफाईची जबाबदारी आता संबंधित प्रभाग अधिकारी,आरोग्य अधिकारी,आरोग्य निरीक्षक यांच्याकडे राहिल. ठेकेदाराच्या चूकीच्या पध्दतीला वाव देणार नाही.साफसफाई होत नसेल आणि निष्काळजीपणा दिसून येत असेल तर मक्ता रद्दबाबत निर्णय घेवू असे आयुक्तांनी सांगितले. तसेच संबंधित जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करणार अशी तंबी आयुक्त टेकाळे यांनी दिली.
वाहनावरील चेसीस गेले कुठे – धिरज सोनवणे
विद्युत विभागाकरीता खरेदी करण्यात आलेल्या वाहनांवरील चेसीस गेले कुठे असा सवाल उपस्थित करत निविदा प्रक्रियाबाबत खुलासा करावा तसेच दोषींवर कारवाई करावी अशी मागणी धिरज सोनवणे यांनी केली. याच विषयावर नितीन लढ्ढा यांनीही नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याची भूमिका मांडली. दरम्यान,ठराव तहकुब करण्यात आला.तसेच निविदा प्रक्रिया नव्याने करण्यात येईल आणि संबधित दोषी अधिकार्‍यावर कारवाई करण्यात येईल असे आयुक्त टेकाळे यांनी सांगितले.

राज्यकर्त्यांचा विश्‍वास नाही का?- सुनिल महाजन
शिवाजीनगर पुलाचे नकाशे बदलले आहे का? अशी विचारणा नवनाथ दारकुंडे यांनी सभागृहात केली.यावर शहर अभियंता सुनिल भोळे यांनी याबाबतचा असा कुठलाही प्रस्ताव नाही असे सांगितले. दरम्यान, आपण ठराव करतो.आणि काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. त्यामुळे आपल्याला काहीच माहित पडत नाही.सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कामं जातात याचा अर्थ राज्यकर्त्यांचा विश्‍वास नाही का? अशी टीका सुनिल महाजन यांनी केली.

खुल्या जागेच्या संस्थांमधील कार्यकारिणीचा ठराव बहुमताने मंजूर
मनपा मालकीच्या खुल्या जागेवरील संस्थांमधील कार्यकारिणीत आयुक्त आणि महापौर यांचा समावेश करण्याबाबतच्या ठरावाला शिवसेनेने विरोध केल्यामुळे हा ठराव बहुमताने करण्यात आला आहे. मात्र नितीन लढ्ढा यांनी विरोध करत चूकीचे पांयडे पडत असल्याची खंत व्यक्त केली.

पारीकपार्कच्या नामकरणाचा ठराव रद्द
ओंकारनगरातील पारीक पार्क उद्यानाला संत शिरोमणी नामदेव महाराज उद्यान असे नामकरण करण्याचा अशासकीय प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला होता.मात्र बंटी जोशी यांनी पारीकपार्क असे नाव राहू द्यावे. एखादी दुसरी जागा विकसीत करुन नाव दयावे अशी सभागृहाला विनंती केली. त्यामुळे नामकरणाचा ठराव रद्द करण्यात आला.
जिल्हा नियोजन समितीतील सदस्यांचा सत्कार
जिल्हा नियोजन समितीवर मनपाचे नगरसेवक नितीन बरडे,अमर जैन,सदाशिव ढेकळे,सुरेश सोनवणे,भारती सोनवणे,पार्वता भिल यांची निवड करण्यात आली.त्याबद्दल महासभेत त्यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच शहरात 250 झाडे लावून ती जगविल्यामुळे राष्ट्रपाल सुरळकर यांचाही सत्कार करण्यात आला.