साफसफाई ठेकेदारावर 1 कोटी 84 लाखाचा दंड

0

उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांची माहिती

जळगाव– शहरातील साफसफाईसाठी मनपाने वॉटर ग्रेस कंपनीला ठेका दिला आहे. मात्र शहरात ठेकेदाराकडून योग्यरित्या साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सभागृहात नगरसेवकांचीही साफसफाईबाबत ओरड असते.दरम्यान,साफसफाईत दिरंगाई दिसून आल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद असल्याने गेल्या साडेतीन महिन्यात ठेकेदारावर 1 कोटी 84 लाखाचा दंड करण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी दिली.

शहरात साफसफाईसाठी वॉटर ग्रेस कंपनीला पाच वर्षासाठी 75 कोटींचा एकमुस्त ठेका देण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यापासून साफसफाई सुरु आहे.मात्र साफसफाई होत नसल्याने तसेच ठेकेदाराकडून अटी-शर्तीचे भंग होत असल्याने ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली आहे.ऑगस्टमध्ये 31 लाख,सप्टेंबरमध्ये 79 लाख तर ऑक्टोबरमध्ये 74 लाख असे एकूण 1 कोटी 84 लाखाचा दंड ठेकेदारावर करण्यात आल्याची माहिती उपायुक्त दंडवते यांनी दिली.

कामचुकारपणा केल्यास कर्मचार्‍यांवर कारवाई

ठेकेदाराकडून साफसफाई होते की नाही याची युनिटनिहाय जबाबदारी आरोग्य अधिक्षक, निरिक्षकांकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांनी दुर्लक्ष केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील उपायुक्तांनी दिला.