‘सामना’चा धुरा रश्मी ठाकरेंकडे !

0

मुंबई: सामना या शिवसेनेच्या मुखपत्राच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. ‘सामना’ला पहिल्यांदाच महिला संपादक मिळाल्या आहेत. यापूर्वी सामनाचे संपादकपद उद्धव ठाकरे यांच्याकडे होते. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, संपादकपदामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांनी संपादकपद सोडले. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सामनाचे कार्यकारी संपादक आहेत.

सामनामधून शिवसेनेची राजकीय भूमिका, विचार प्रखरपणे मांडले जातात. सामनामध्ये लिहिले जाणारे अग्रलेख देशभरात चर्चेचा विषय असतात. ९० च्या दशकात आपली राजकीय भूमिका, विचार महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या दैनिकाची सुरुवात केली. २३ जानेवारी, १९८९ रोजी मध्यरात्री ‘सामना’ दैनिकाची सुरुवात झाली. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात, मोठ्या थाटामाटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते ‘सामना’चे प्रकाशन करण्यात आले.