मुंबई: महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नसल्याचे काँग्रेस नेत्यांनी उघडपणे सांगितलेले आहे. यावरूनच महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याची चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान आज सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखात देखील काँग्रेसला लक्ष करण्यात आले आहे. ‘राजकारणातील खाट कुरकुर करते’ अशा शब्दात काँग्रेसला टोला लगावण्यात आला आहे. दरम्यान आता यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब सथोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या हिताच्या दृष्टीने आमच्या काही मागण्या असून त्याबाबत आम्ही आग्रही आहोत, यात कुरकुर काही नसून सामन्यातील अग्रलेख हा अपूर्ण माहिती घेऊन लिहिला गेल्याचा पलटवार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. सामना हा शिवसेनेचा मुखपत्र आहे, लिखाण करणे त्यांचा अधिकार आहे मात्र त्यांनी पूर्ण माहिती घेतली पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला आहे. आमच्या काही मागणी असून त्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहोत, मुख्यमंत्र्यांनी वेळ दिल्यानंतर भेट घेऊन चर्चा करू. त्यानंतर पूर्ण माहिती घेऊन सामनाने पुन्हा अग्रलेख लिहावा असाही टोला त्यांनी लगावला. आम्ही आघाडी सरकारसोबत असून आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचेही थोरात यांनी सांगितले.