सामन्यावर श्रीलंकेची पकड

0

कोलकाता । सुरंगा लकमल (26 धावांमध्ये चार विकेट्स), लाहिरु गमागेच्या (59 धावांमध्ये दोन विकेट्स) प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर कसोटी क्रिकेट क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाला इडन गार्डनवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी 172 धावांवर गुंडाळल्यावर श्रीलंकेने पहिल्या डावात चार विकेट्सच्या मोबदल्यात 165 धावा करत सामन्यावर पकड मिळवली आहे. भारतातील पहिल्या विजयासाठी आस लावून असलेला श्रीलंकेचा संघ अजूनही सात धावांनी पिछाडीवर आहे. श्रीलंकेच्या डावात लाहिरु तिरमाने (51) आणि माजी कर्णधार 52 धावांची शानदार खेळी केली. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली.

वेगवान गोलंदाज उमेश यादवने सलग दोन षटकांमध्ये या दोघांच्या विकेट्स मिळवत भारताला सामन्यात बाऊन्सबॅक करुन दिले. एकवेळ श्रीलंकेचा संघ 2 बाद 133 धावा अशा भक्कम स्थितीत होता. त्याआधी वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वरकुमारने 34 धावांमध्ये दोघा सलामीविरांना बाद करत श्रीलंकेला अडचणीत आणले होते. भुवनेश्‍वरने दिमुथ करुणारत्नेला (8) पायचित केले. त्यानंतर त्याने सदीरा समरविक्रमाला (23) यष्टीपाठी रिद्धीमान साहाकरवी झेलबाद केले. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार दिनेश चंडिमल 13 आणि विकेटकिपर निरोशन डिक्वेला 14 धावांवर खेळत होते. भारतासाठी भुवनेश्‍वरने 49 धावांमध्ये दोन आणि उमेश यादवने 50 धावांमध्ये दोन विकेट मिळवल्या.

12 वर्षांनंतर सर्वात कमी धावसंख्या
भारतीय संघाचा या सामन्यामध्ये 172 धावांवर ऑल आऊट झाली. ही धावसंख्या भारतीय संघाची मागील 12 वर्षांतील आपल्या घरच्या मैदानात सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी चेन्नईत 2005 मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 167 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे हा सामना भारताने जिंकला होता. दुसर्‍या क्रमाकांची सर्वात कमी धावसंख्या सात वर्षांनंतर एखाद्या कसोटी सामन्याच्या इनिंगमध्ये भारतीय संघाने 50 धावा होण्याआधीच पाच विकेट्स गमावल्या. यापूर्वी 2010 मध्ये न्यूझीलंडविरोधात खेळताना अहमदाबादमध्ये भारताने अशी कामगिरी केली होती.

सुरंगा लकमलचा निर्धाव षटकांचा विक्रम
या सामन्यामध्ये श्रीलंकेचा गोलंदाज सुरंगा लकमल याने एक अनोखा विक्रम बनवला आहे. लकमलने 11 षटकांपैकी 9 षटकांमध्ये निर्धाव टाकली. 11 षटकांमध्ये त्याने केवळ 5 धावा देत, तर 3 विकेट्स मिळवल्या. लकमलने टाकलेल्या सलग 46 चेंडूंवर भारतीय फलंदाजांना एकही धाव घेता आली नाही. यापूर्वी भारतीय संघाविरुद्ध निर्धाव षटके टाकण्याचा विक्रम चामिंडा वास याच्या नावावर होता. त्याने 2005 मध्ये सलग 11षटके निर्धाव गोलंदाजी केली होती.

केएल राहुल शून्यावर बाद
कोलकाताच्या ईडन गार्डनवर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात लोकेश राहुल शून्यावर बाद झालाय. सुरंगा लकमलच्या चेंडूवर लोकेश बाद झाला. या सामन्यामध्ये लोकेश राहुल पहिल्याच चेंडवर बाद झाला. कसोटी सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूंवर बाद होणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरलाय.

विराट कोहलीला ग्रहण
सध्या फॉर्मात असलेला कर्णधार विराट कोहलीने आपल्या नावावर एक विचित्र विक्रम बनवला आहे. एका वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा कर्णधाराचा विक्रम कोहलीने बनवला आहे. एका वर्षात शू्न्यावर जास्त वेळा बाद होण्याचा विक्रम यापूर्वी कपिल देव याच्या नावावर होता. कपिल देवने 1983 साली पाच वेळा बाद होण्याचा विक्रम केला होता.

भारताच्या 172 धावा
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 172 धावांवर आटोपला, चेतेश्‍वर पुजाराच्या अर्धशतकाचा उपवाद वगळता अन्य आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. भारतार्फे चेतेश्‍वर पुजाराने सर्वाधिक 52 धावांची खेळी साकारली. रिद्धीमान साहा आणि रवींद्र जडेजाने सातव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी रचत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र श्रीलंकेच्या प्रभावी मा़र्‍यासमोर भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. रिद्धिमान साहा याने 29 धावा केल्या. रवींद्र जडेजा 22, भुवनेश्‍वर कुमार 13, मो. शमी 24 धावांवर बाद झाला. उमेश यादव 6 धावांवर नाबाद राहिला, के. एल. राहुल 0 तर, शिखर धवन 8, विराट कोहली 0, रहाणे 4 आणि रविचंद्रन अश्‍विन 4 धावांवर बाद झाला. श्रीलंकेच्या सुरंगा लकमलने भारताच्या चार फलंदाजांची विकेट घेतली.