बारामती । सामाजिक अर्थसहाय्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बारामती तालुक्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहता कामा नये, यासाठी आपल्या गावात, परिसरात योजनांविषयी माहिती देण्याचे आवाहन तहसिलदार हनुमंत पाटील यांनी केले. बारामती सिल्वर ज्युबली हॉस्पिटल येथे सामाजिक अर्थसहाय्य योजनेंअंतर्गत अपंग लाभार्थी मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय अधीक्षक मीरा चिंचोलीकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राहुल तावरे, समितीचे सदस्य, नायब तहसिलदार महादेव भोसले उपस्थित होते.अपंग व्यक्तींच्या तपासणीनंतर पात्र व्यक्तींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येईल. प्रमाणपत्र मिळालेल्या व्यक्तींनी सजंय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रांच्या पुर्ततेसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
निराधार योजनेविषयी माहिती
संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष तावरे यांनी निराधार योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. सामाजिक अर्थसहाय्य योजनांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, आम आदमी विमा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजनांचा समावेश आहे. मेळाव्यात तालुक्यातील जवळपास 102 अपंग लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली.