पुणे । जिल्ह्यात सामाजिक अर्थसहाय्य योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच एकही पात्र लाभार्थी शासनाच्या कल्याणकारी योजनापासून वंचित राहू नये म्हणून 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारी 2018 दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.समाजातील गोरगरीब व वंचित लोकांसाठी शासन विविध योजना राबवत असून त्यांच्या सक्षमीकरणासाठी योजनांद्वारे आर्थिक मदत करत असते, परंतु लोकसंख्या ज्या तुलनेत पात्र लाभार्थींचे प्रमाण अत्यंत कमी असून नागरिकांना सामाजिक, अर्थसहाय्य योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याचे राव म्हणाले.
समाजातील प्रत्येक वंचित घटकांसाठी योजना
सामाजिक अर्थसहाय्य योजने अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक वंचित घटकांसाठी योजना राबविण्यात येत आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, म.फुले जनआरोग्य योजना, घटस्फोटित महिलांसाठी योजना, परित्यक्त्या स्त्रियांसाठी योजना, वेश्या व्यवसायातून बाहेर पडलेल्या स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी अर्थसहाय्य योजना अशा समाजातील प्रत्येक वंचित घटकांसाठी अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत असल्या तरी योजनांच्या लाभार्थींचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे या मोहिमेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
2.5 ते 5 एकर शेतीचे क्षेत्र असलेल्यांची गाव निहाय यादी
तसेच आम आदमी विमा योजनेसाठी तहसील स्तरावर तालुक्यातील डीबीए (सातबारा संगणकीकरण करत असलेले) 2.5 ते 5 एकर शेतीचे क्षेत्र असलेल्या शेतकर्यांची गाव निहाय यादी घेण्यात येणार असून जास्तीतजास्त भूमिहीन आणि शेतमजूर यांच्याकडून आम आदमी विमा योजनेचे फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत. तसेच दारिद्ररेषेेखालील अकरा महिन्यात मयत झालेल्या व्यक्तींच्या याद्या करण्यात येणार असून 18 ते 59 वयोगटातील मयतांच्या वारसांना राष्ट्रीय कुंटुंब अर्थसहाय्य योजनेतून लाभ देण्यात येणार आहे. राव म्हणाले, या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम, शिबिरे, ग्रामसभांच्या माध्यमातून जास्तीजास्त पात्र लांभार्थ्यांचा शोध घेण्यात येणार असून अर्ज 25 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर अखेर पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील 29 रूग्णालये
या मोहिमे अतंर्गत म.फुले जन आरोग्य योजने अंतर्गत जिल्ह्यातील 29 रूग्णालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे माहिती फलक लावण्यात येणार आहेत. तसेच संबंधित हॉस्पिटलशी संपर्क करून दर महिन्याला दुर्धर आजारासाठी म.फुले जनआरोग्य योजनेत उपचार घेत असलेल्या रूग्णांची माहिती घेऊन पात्र रूग्णांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ देण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील योजना निहाय लाभार्थी संख्या
इंदिरा गांधी निराधार अनुदान योजना : 30818
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ः 23226
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृती वेतन योजना ः 10074
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना ः 652
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना ः 116