सामाजिक आणि पर्यावरण प्रेमी संघटनांच्या प्रयत्नांमधून हिरवाई वाढविण्याचा प्रयत्न

0
घोरावडेश्‍वर डोंगरावर मोकाट वळुंंचा उच्छाद
मोकाट वळुंचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी
देहुरोड : विविध सामाजिक आणि पर्यावरण प्रेमी संघटनांच्या प्रयत्नांमधून जुना पुणे-मुंबई महामार्गावर असलेल्या घोरावडेश्‍वर डोंगराला हिरवाईचा शालू नेसविण्यात येत आहे. या डोंगरावर वनराई विपुल प्रमाणात होती. मात्र मागील काही वर्षात येथे बेसुमार वृक्षतोड झाली. अनेक सामाजिक संस्थांच्यावतीने, संघटनांच्यावतीने येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस झाडांची संख्या वाढते आहे. त्यामुळे तिथे येणार्‍या नागरिकांची संख्यादेखील वाढते आहे. दररोज सकाळी शेकडो नागरिक डोंगरावर व्यायामासाठी जातात. अशातच डोंगराच्या पठारावर 20 ते 25 वळुंनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. त्यामुळे डोंगरावर दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना तसेच व्यायामासाठी येणार्‍या नागरिकांना याचा त्रास होतो आहे.
लहानथोर सर्वांची गर्दी
घोरावडेश्‍वर डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्याने हा परिसर दिवसेंदिवस नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध होत आहे. दररोज सकाळपासून ते सायंकाळपर्यंत शेकडो नागरिक डोंगराला भेट देतात. इथल्या झाडांसोबत तासन्तास वेळ घालवतात. कधी डोंगराच्या पायथ्यावरुन पाणी आणून झाडांना दिले जाते. तर कधी झाडांची मशागत केली जाते. यामुळे डोंगरावर लावलेली झाडे वाढत आहेत. लावलेल्या झाडांची काळजी घेतली जाते आहे. त्यामुळे येथील हिरवळ फुलू लागली आहे. दररोज सकाळी, सायंकाळी शहर आणि परिसरातील नागरिकांची व्यायामासाठी इथे गर्दी असते. शनिवार आणि रविवारी तर सुट्टी असल्याने विशेष गर्दी असते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत डोंगराच्या पठारावर येतात.
मोकाट जनावरे जास्त
मागील काही दिवसांपासून डोंगरावर येणार मोकाट जनावरांची संख्या वाढत आहे. धारदार शिंगे, जाडजूड असलेले वळू पठारावर येतात. काही वेळेला त्यांच्यामध्ये झुंजही लागते. तर काही वेळेला हे वळू पठारावर व्यायामासाठी आलेल्या लहान मुले आणि वृद्धांच्या अंगावर धावून जातात. डोंगराच्या वरच्या पठारावर हा सगळा प्रकार होत असल्याने मुले आणि नागरिक डोंगराच्या पायथ्याच्या दिशेने धाव घेतात. डोंगराचा उतार अतिशय तीव्र आहे. त्यामुळे पळताना सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे मोकाट सुटलेल्या वळुंचा संबंधित यंत्रणांनी तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
अनुचित प्रकार घडेल
घोरावडेश्‍वर डोंगरावर नियमित व्यायामासाठी जाणारे दिलीप देसाई म्हणाले की, अलीकडच्या काही दिवसांमध्ये घोरावडेश्‍वर डोंगरावर मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जनावरांचा वावर असल्याबाबत कोणतीही तक्रार नाही. पण ती जनावरे लहान मुले आणि वृद्ध नागरिकांच्या अंगावर धावून जातात. यामुळे काही अनुचित प्रकार घडण्याचा धोका आहे. डोंगरावर दररोज सुमारे 500 लोक येत असतात. डोंगरावर लावलेल्या झाडांचे देखील ही जनावरे नुकसान करीत आहेत. याची प्रशासनाने वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.