पुणे-ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले यांना काळे फासण्याचा इशारा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतले. पुण्यात एका आंदोलनादरम्यान त्यांनी हा इशारा दिला होता. त्या संदर्भात पोलीस आज तृप्ती देसाई यांच्या कात्रजमधील घरी पोहचले आणि देसाईना ताब्यात घेतले.
ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले यांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता म्हणून नेमणूक करून घेतल्याचा गंभीर आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला होता. बनावट प्रमाणपत्र सादर करून डॉ.चंदनवाले यांनी शासन आणि अपंगांची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्र्यानी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली होती.
डॉ.चंदनवाले हे मुळचे जळगावचे रहिवाशी असल्याने त्यांच्यावर भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा वरदहस्त आहे, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोपही देसाई यांनी केला आहे. डॉ.चंदनवाले यांच्याकडे दुचाकी आणि चारचाकीचे लायसन्स आहे, मग अपंग असताना ते गाडी कशी चालवू शकतात असा सवालही देसाई यांनी उपस्थित केला.
शासनाचे नियम आणि अपंगत्वाच्या निकषानुसारच ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता पद मिळाले आहे. माझी नेमणूक ही महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या नियमानुसारच करण्यात आल्याचे सांगत डॉ. चंदनवाले यांनी तृप्ती देसाईकडून करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत.