सामाजिक कार्याचा प्रेरणास्रोत…

0

तमोमय जीवन जगणार्‍या समाजाला उजेडाचे डोळे देणारा समूह म्हणजे थंडरबोल्ट. या समूहाचा काल चौथा वर्धापन दिन दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात साजरा करण्यात आला. कवी म्हणून जगताना आजवर अनेक भव्य दिव्य कार्यक्रम पाहण्याचा योग आला होता. परंतु, एवढे कार्यक्रम करून व अनेक पुरस्कार मिळवूनही आयुष्यात काही तरी बाकी राहिल्यासारखे सतत वाटायचं. आपण समाजाचे देणे लागतो या विचाराने अस्वस्थ झालेले माझे मन या कार्यक्रमाने प्रसन्न होऊन गेले. जणू काय जीवनभराच्या साठवणीतला हा क्षण म्हणजे सर्वाधिक मौल्यवान आणि महत्त्वाचा असल्यासारखे वाटले. दैनंदिन जीवनात मेहनत आणि त्यासाठी करावा लागणार अत्यंत जोखमीचा प्रवास व त्यामुळे होणारी धडपड मनाला व मनातील सकारात्मक ऊर्जेला अचेतन करून टाकते.

माणूस हल्ली निरनिराळ्या प्रेक्षणीय स्थळी जाऊन मनाला प्रफुल्लित करण्याची धडपड करतो. परंतु, माणसाचे हे सारे प्रयत्न निष्फळ ठरतात. कामाच्या व्यापातून थकलेल्या लोकांसाठी थंडरबोल्ट या समूहात सहभागी होण्याचा सल्ला मी देऊ इच्छितो. कारण हा समूह आपल्याला दिव्यतेने भारावलेल्या प्रेरणास्थानांना भेटी देऊन एका वेगळ्या दुनियेचे दर्शन घडवतो.

जिथे जाताच
आपल्या प्रेरणेस प्रेरणा मिळते,
उत्साहाची भेट घडते,
अभेद्य आपले दुःख अवघे,
सकारात्मतेकडे वळते…

अशा ध्येयवेड्या काजव्याचे, होय ध्येयवेडा काजवाच म्हणेन महेशदादांना! जे आपल्या अतुल्य तेजाने अशा दिव्यांग व्यक्तीच्या जीवनात आनंदाचे प्रकाश पाडतो. अशा माणसाने आरंभलेल्या सुंदर सोहळ्याचे साक्षीदार होताना हृदयाचा कण कण असंख्य आनंदाचे दिव्य थेंब प्राशून नव प्रेरणेने तरारून जात होता. मित्रहो! थंडरबोल्ट समूह चार वर्षांपासून कार्यरत आहे. आपल्या जीवनात जसे नकळत सारे घडते अगदी तसाच मी या समूहाशी जोडला गेलो. या समूहाचे संस्थापक लेखक व पत्रकार महेश पवार आहेत. आज समाजात अशा अनेक निराधार व्यक्ती आहेत ज्यांना आपल्या प्रेमाची, मायेची आणि मदतीची गरज असते अशा लोकांसाठी मदतीचा, प्रेमाचा, मायेचा हात पुढे करणारा अवलिया म्हणजे महेश दादा. त्यांनी आपल्या या कामाचा गवगवा कधीच केला नाही, कुणाला कसली, कशाची व कोणत्या प्रकारची मदत केली हे त्यांनी आजवर कधीच जगजाहीर केले नाही. आपल्याकडून जेव्हढं शक्य होईल तेवढी मदत ते अशा लोकांना करत गेले व आजही करत आहेत. आता तुम्हाला या व्यक्तीबद्दल नक्कीच प्रश्‍न पडला असेल की, कोण आहेत या व्यक्ती ज्यांना अशी मदत केल्यावर लोकांना अफाट आनंद मिळतो.

समाज अशा लोकांना दिव्यांग व्यक्ती म्हणतो. ज्यात, अंध, मतिमंद, अनाथ व्यक्ती अगदी वृद्धांपासून कोवळ्या जीवांपर्यंतचे जीव असतात. मी अशा ठिकाणांना प्रेरणास्थान असंच म्हणेन आणि त्यात राहणार्‍या या दिव्यदूतांना प्रेरणास्रोत. आपल्या संसाराचा गाडा सांभाळून या समाज कार्यात तल्लीन झालेल्या आमच्या महेश दादांना मानाचा मुजरा. कालच्या कार्यक्रमात त्यांनी अशाच काही ध्येयवेड्या माणसांना आमंत्रित केलं होतं. ज्यांचे जाहीर सत्कार व त्यांना मायेची हिंमत देण्याचे काम आजवर सरकारनेही केले नसेल असे काम थंडरबोल्टने एक परिवर्तन समूहाने केले.

कालच्या कार्यक्रमात उपस्थित ध्येयवेड्या अद्वितीय माणसांनी समाजातील दिव्य दूतांना सांभाळण्याचा जो काही विडा उचलला आहे आणि ते कार्य करत असताना त्यांना आलेले कटू अनुभव ऐकताना सभागृहातील श्रोत्यांसह भिंतींनाही पाझर फुटल्याचे जाणवत होते. मित्रांनो! आपल्याला आपल्या परिपूर्ण पाल्याला सांभाळताना नाकी दम येतो. मग, अशा दिव्यांग मुलांना, तरुणांना व वृद्धांना सांभाळताना त्यांच्या मनाचे काय होत असेल या विचाराने मन सुन्न होते. पण हे सारं ते अगदी आनंदाने करतात. खरं तर आपण आपला मोकळा वेळ घालवण्यासाठी सिनेमे बघतो, नको नको त्या ठिकाणी फिरायला जातो, पार्ट्या करतो, वाढदिवसांना लाखो पैसे खर्च करतो आणि एवढं करूनही शेवटी आनंद व मनःशांती मिळाली नाही म्हणून रडत बसतो. परंतु, मित्रांनो, मी एक ठामपणे सांगू इच्छितो तुम्ही आपल्या संपूर्ण कुटुंबासह निदान एकदा तरी अशा ठिकाणांना अवश्य भेट द्या. तिथल्या मुलांशी, व्यक्तींशी व त्यांना सांभाळणार्‍या माणसांशी दिलखुलासपणे बोला. त्यांच्या सहवासात काही क्षण घालवा. मग, बघा! तुम्हाला खरे जगणे काय असते ते कळेल. आपण तर जीवनात संकटे आली की बावरतो. आत्मविश्‍वास गमावून बसतो. परंतु, खरे संकट काय असते व त्यावरही मात करून जगण्याला टक्कर देऊन आयुष्य जगणे काय असते, हे तुम्हाला तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. तुम्हाला या ठिकाणांची माहिती नसेल तर महेश पवार दादांना भेटा किंवा त्यांच्या या समूहात सहभागी व्हा! पण, नुसते सहभागी होऊन चालत नसते तर कार्यतत्परही राहावे लागते.

एखादी व्यक्ती असे असामान्य कार्य करत असेल तर त्याला निदान प्रोत्साहन देण्यासाठी तरी समाजातील तरुणांनी पुढे आले पाहिजे, असे मला वाटते. कारण कालच्या कार्यक्रमात असे दिसून आले की, अनेक माणसांनी लढ म्हणण्याचे धैर्य देऊन पाठीशी असल्याची हमी दिली आणि प्रत्यक्ष लढण्याची वेळ आली. त्यावेळी मात्र महेश नावाच्या नृपाची काही व्यक्ती वगळता सारी सेनाच पळून गेल्याचे जाणवले. परंतु, तरीही हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याला साहित्यक्षेत्रातील सौ. पल्लवी बनसोडे म्हणजे माझी लाडकी दीदी उपस्थित होती. तिनं सूत्रसंचालनाची सारी सूत्रं उत्तमरीत्या सांभाळली. अभिनय क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुराधा राजाध्यक्षताई उपस्थित होत्या तसेच आहारतज्ज्ञ कांचन पटवर्धन, उद्योगपती कांचन तेली, पत्रकार वैशाली आहेर, अभिनेत्री मानसी राजे, अभिनेत्री गीत निखारगे, निर्मात्या वैशाली भगत, पुण्य नगरीचे पत्रकार राजेश दाभोळकर सर हे सर्व समूहाचे सदस्य बरं! कवयित्री लेखिका ज्योती कपिले मॅडम, छाया गोवारी, पाणिनी प्रकाशन संस्थेच्या वृषाली शिंदे ताई असे अनेक दिग्गज उपस्थित होते.

या कार्यक्रमात निराधार महिलांना घर मिळवून देणार्‍या घरकुल संस्थेच्या विद्या फडके मॅडम, गतिमंद मुलांची आधार संस्थेच्या अंबिका टाकळकर मॅडम, अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणार्‍या जयश्री बागडे मॅडम, 85 हून अधिक अनाथ मुलांचा सांभाळ करणारे सहारा बालग्रामचे संतोष गर्जे यांच्या मुलाखती ऐकल्या आणि ऊर भरून आला. नकळत सारे घडले आणि डोळेही पाणावले असेच झाले. थंडरबोल्ट समूहाच्या जीवनदीप अंकाचे प्रकाशनही यानिमित्ताने झाले. या अंकामध्येही आमच्यासारख्या कवी, कवयित्री, लेखकांना स्थान न देता म्हणजे नेहमीच्या अंकामध्ये आपल्याला दिसणार्‍या कथा, लघुकथा आणि कवितांना स्थान न देता केवळ अनाथ, अपंग, गतिमंद मुलांसाठी कार्य करणार्‍या, त्यांचा सांभाळ करणार्‍या संस्थांची एकत्रित माहिती दिली. आणि त्याचे प्रकाशनही कुणाच्या हस्ते व्हावे? अहमदनगरचे शेखर मांडुगळे जे स्वतः अपंग असूनही आपल्यासारख्या 99 अपंग व्यक्तींना सांभाळत आहेत. त्यांच्या जीवनात आनंद मिळवून देत आहेत. ते प्रमुख पाहुणे होते आणि जन्मतः अपंग असूनही अनेक पुरस्कारांसह राष्ट्रपतीपदक मिळवणार्‍या मनाली कुलकर्णी होती प्रकाशनाच्या कार्यक्रमाची अध्यक्ष. या एकूणच कार्यक्रमात आणि या समूहात सहभागी होण्याचे भाग्य मला महेश दादांमुळे लाभले त्याबद्दल महेश दादा आणि संपूर्ण थंडरबोल्ट परिवाराचे मनःपूर्वक आभार व शेवटी एवढंच म्हणेन की,

जिद्दीसंगे चालत असता
ध्येयपूर्तीचा धागा जुळतो
अनुभवाच्या गोड क्षणांनी
भविष्यकाळ धुंद फुलतो
त्याच क्षणांच्या सोबतीने
मार्ग पुढले चालत जावे
काल जळाल्या उमेदीवर
फुंकरीचे अत्तर लावावे
मग जिद्द रांगू लागेल
यशाकडे झेपावू लागेल
आणि पंखास बळ मिळेल
पुन्हा नव्याची वाट दिसेल

खरं सांगतो मित्रांनो अशा प्रेरणास्थळांना निदान एकदा तरी भेट द्या आणि आपल्या आयुष्यातील अनेक गोड क्षणांमध्ये तिथं मिळालेल्या आनंदी समाधानाचा समावेश करून घ्या अशी माझी विनंती आहे. खरं तर महेश दादा थंडरबोल्ट समुहामार्फत एवढं सुंदर काम करत आहेत हे सर्वांना कळण्यासाठी हे लिखाण करावंसं वाटलं. कारण आज जर आपण काही चांगलं काम करत आहोत हे जगाला कळलं नाही. तर, त्या व्यक्तीची आणि त्याच्यातील सुप्त गुणांची, दिव्यतेची ओळख जगाला कशी होणार? म्हणून हे सारं शब्दात मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे. आज महेश पवार आणि थंडरबोल्ट एक परिवर्तन सारख्या तरुणांची, समुहाची देशाला आणि समाजातील अशा दिव्य व्यक्तींना समानभुतीचा, मायेचा, प्रेमाचा परिसस्पर्श देण्यासाठी खरी गरज आहे. पुन्हा एकदा महेश दादा आपल्या या कर्तृत्वाला मनापासून सलाम!

– निलेश उजाळ
7045398561