हडपसर। आपल्या सामाजिक कार्याने तरुणाई समोर आदर्श निर्माण करणारे आझादसिंग बच्चूसिंग टाक यांना महापालिकेच्या वतीने नुकतेच गौरविण्यात आले. महापालिकेच्या वतीने शहर परिसरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्या कार्यकर्त्यांचा दरवर्षी 15 ऑगस्टला गौरव करण्यात येतो. यंदा हडपसरमधून आझादसिंग टाक यांची निवड करून त्यांना महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ,नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते, शहीद भगतसिंग ग्रुपचे अध्यक्ष,जीवरक्षक बच्चुसिंग टाक यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत आझादसिंग यांनी काही वर्षांपासून शेकडो बेवारस मृतदेहांना पोस्ट मार्टेमकरीता नेण्यासाठी पोलीसांना मदत केली, अपघातग्रस्तांना मदत, मुक्या प्राण्यांना कॅनॉलमधून बाहेर काढून वाचविणे अशी जोखमीची कामे करत त्याने विविध सामाजिक उपक्रमांमध्येही आपला सहभाग नोंदवला. या कार्याची दखल घेऊन महापालिकेच्या वतीने त्यांना यंदा गौरवण्यात आले.
आझादसिंग टाक यांना नुकताच मुंबईत मानाचा समजल्या जाणार्या ‘स्टार ऑफ इंडिया नॅशनल अॅवार्ड’ हस्ते मिळाला. या सन्मानाबद्दल आझादसिंग टाक यांचे निलेश मगर, प्रशांत सुरसे, नगरसेवक मारुती तुपे, नितीन होले, संदीप सरोदे, उमेश महाडीक, संजय शिंदे आदींसह हडपसर परिसरातील विविध राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.