सामाजिक दरोडेखोर!

0

पन्नास शंभर वर्षांआधी जे जंगली डाकू होते, ते डाकू जरी असले तरी फार अनुशासित होते. त्यांचे बरेच सिद्धांत होते. विनाकारण ते कुणावर अन्याय, अत्याचार करत नव्हते. फक्त ज्यांनी त्यांच्यावर अन्याय केला फक्त त्यांच्यावरच ते प्रहार करायचे, त्यांची हत्या किंवा लूटपाट करायचे. महिलांना ते त्रास देत नव्हते किंवा त्यांचे लैंगिक शोषण करत नव्हते आणि विशेष म्हणजे लुटलेल्या मालमत्तेतून गरीब आणि अनाथ लोकांची मदत करायचे. आधीचे डाकू अशिक्षित होते, अज्ञानाच्या काळोखामुळे ते दरोडेखोर बनले होते. पण आजचे डाकू शत-प्रतिशत सुशिक्षित आहेत. आजच्या सुशिक्षित डाकू समाजाची भोगविलासी प्रवृत्ती मानसिक विकृतीचा कळस गाठत आहे. त्यांनी माणुसकीच्या सर्वच सीमा पार करून टाकल्या आहेत. आजकाल या डाकूंचे अस्तित्व अगदी साधारण परिवारापासून तर संसद भवनापर्यंत पाहायला मिळेल.

दरोडेखोर किंवा डाकू हा शब्द वापरताच आपल्या डोळ्यासमोर शोलेचा गब्बर किंवा दस्यू सुंदरी बँडिट क्वीन यांचे अजरामर अभिनय दृश्य नाचायला लागते. हातात बंदूक, वाढलेली दाढी, मळकट कपडे, बंदुकीच्या गोळ्यांचा कमरपट्टा, त्यांचे कधीही विसरता न येणारे संवाद अरे वो सांभा, कितने आदमी थे क्रूर चेहरा आणि सोबत मदिरा, नचनिया, मांसाहारी भोजन, आणि नाच गाणे मुजरा, असे डाकू समाजापासून दूर राहायचे, जंगलात राहायचे आणि बेकायदा गावात दवंडी पिटवून, ज्यांच्या घरी दरोडा टाकायचा आहे त्यांना पूर्वसूचना देऊन मग डाका टाकायचे. ज्यांच्यावर सावकार आणि इतर दबंग समाज व्यवस्थेने अत्याचार केलेत असेच लोक बदला घेण्यासाठी आपली एक टोळी तयार करायचे. आपण सभ्य समाज त्यांना डाकू किंवा आतंकवादी म्हणतो.आधी स्वतःवर झालेल्या अत्याचारामुळे लोक डाकू किंवा दरोेडेखोर यांच्या टोळक्यात सामील व्हायचे. पण आज आपल्या भौतिक आणि विलासी गरजा पूर्ण करण्याकरिता 90 टक्के समाज सुशिक्षित डाकू झाला आहे. आपल्या वैभवाचा, आर्थिक, राजकीय, प्रशासनिक, शारीरिक, बौद्धिक ताकदीचा वापर करून सामाजिक शोषण करणारे डाकू आज सर्वच क्षेत्रात आपणास पाहायला मिळेल.

पन्नास शंभर वर्षांआधी जे जंगली डाकू होते, ते डाकू जरी असले तरी फार अनुशासित होते. त्यांचे बरेच सिद्धांत होते. विनाकारण ते कुणावर अन्याय, अत्याचार करत नव्हते. फक्त ज्यांनी त्यांच्यावर अन्याय केला फक्त त्यांच्यावरच ते प्रहार करायचे, त्यांची हत्या किंवा लूटपाट करायचे. महिलांना ते त्रास देत नव्हते किंवा त्यांचे लैंगिक शोषण करत नव्हते आणि विशेष म्हणजे लुटलेल्या मालमत्तेतून गरीब आणि अनाथ लोकांची मदत कारायचे. आधीचे डाकू अशिक्षित होते, अज्ञानाच्या काळोखामुळे ते दरोडेखोर बनले होते. पण आजचे डाकू शत-प्रतिशत सुशिक्षित आहेत. आजच्या सुशिक्षित डाकू समाजाची भोगविलासी प्रवृत्ती मानसिक विकृतीचा कळस गाठत आहे. यांनी माणुसकीच्या सर्वच सीमा पार करून टाकल्या आहेत. आजकाल या डाकूंचे अस्तित्व अगदी साधारण परिवारापासून तर संसद भवनापर्यंत पाहायला मिळेल.

शैक्षणिक डाकू शिक्षणाचा व्यापार करत आहे. ते केवळ देणगीचीच भाषा समजतात. पात्रता असो किंवा नसो पैसे घेतल्याशिवाय हे दरोडेखोर कुणाचीही नेमणूक करत नाहीत. राजकीय डाकू देशाचा व्यापार करत आहे. त्यांना कोणत्याही किमतीवर सत्ता आणि धन पाहिजे. वेळप्रसंगी ते आपला उद्देश साध्य करून घेण्याकरिता सांप्रदायिक दंगेसुद्धा घडवून आणतात. धार्मिक डाकू धर्माचा व्यापार करत आहे. यांच्यावर सामाजिक सुधार करण्याची जबाबदारी असते, पण हे साधू, धर्मगुरूच सामाजिक शत्रू झाले आहेत. हे स्वतःच वासनेतून मुक्त झालेले नाही. सामाजिक डाकू समाजात फूट पाडून जाती धर्माच्या नावावर दरोडेखोरी करत आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यमे आणि पत्रकारितासुद्धा या दरोेडेखोरीत कुठेच मागे नाही. खाकी पोशाख पाहून तर जनतेला अक्षरशः हृदयविकाराचे झटके येतात. खाकी म्हणजे महाभयंकर भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. रक्षक, रक्षक न राहता भक्षक झाले आहेत. व्यापारिक डाकू खुलेआम बाजारपेठेवर कब्जा करून काळाबाजारी करत आहे. औद्योगिक डाकू सरकारशी हातमिळवणी करून माहागाईचा कळस गाठत आहे.

औद्योगिक डाकू लोकांचा बाजारपेठेवर शत-प्रतिशत कब्जा आहे. वैद्यकीय डाकू ज्यांना लोक देव मानतात ते तर वैद्यकीय तपासण्याच्या नावाखाली, शल्यचिकित्सेच्या नावाखाली रोग्याला अगदी पशू समजून हलाल करत आहे. वेळप्रसंगी मानव शरीर अवयवांचासुद्धा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करत आहे. वैद्यकीय क्षेत्र म्हणजे राक्षसांची टोळी असे संबोधन केल्यास अतिशयोक्ती होऊ नये. वैद्यकीय क्षेत्रात माणुसकी आता राहिलीच नाही. आजारी त्यांच्याकरिता एक सावज आहे. मानव तस्करी, वेश्याव्यवसायास भाग पाडणे असले प्रकार सर्वच स्तरावरील सुशिक्षित, बुद्धिजीवी डाकू फार मोठ्या प्रमाणावर करत आहे. पैसा आणि भोगविलास हाच आज सर्वांचा म्हणजे सुशिक्षित डाकू समाजाचा ईश्‍वर, अल्लाह झाला आहे. कुठल्याही प्रकारे किंवा मार्गाने समाजाचे अहित करणारे आचरण म्हणजे डाकुगिरी किंवा दरोडेखोरी होय. पारिवारिक लैंगिक शोषण, हुंडाबळी, मानसिक, शारीरिक शोषण आणि अत्याचारसुद्धा पारिवारिक डाकू नातेसंबंधांच्या आड मोठ्या चातुर्याने, कौशल्याने पार पाडीत आहे. 70 टक्के शारीरिक आणि लैंगिक शोषण हे चार भिंतीच्या आड, म्हणजे परिवारात होत आहे. यात बाल शोषणाचे प्रमाण जास्त आहे. समाजाचा मानसिक स्तर फार मोठ्या स्तरावर खालावलेला आहे. सुशिक्षित समाज आदिमानवासारखा वागत आहे. समाजाला लागलेला हा अनैतिक दरोडेखोरीचा आजार फार मोठ्या प्रमाणावर समाजाचे पतन करत आहे.

या सर्व मानसिक आजारातून दरोडेखोरीतून मुक्त होण्याचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे आत्मचिंतन. शुद्ध आध्यात्मिक विचार धारण करण्यासाठी देशाला बुद्धाच्या क्रांतिकारी, नैसर्गिक, आणि शास्त्रीय ध्यानसाधनेची गरज आहे. असे शिक्षण काय कामाचे? असा विकास काय कामाचा? जिथे माणूस माणूसपण विसरत चाललाय, सामाजिक पतन, मान मर्यादा, नैतिक मूल्ये यांचा मोठ्या प्रमाणावर र्‍हास होत आहे. देशभक्ती म्हणजे केवळ वादविवाद आणि चर्चा करण्यापुरतीच सीमित राहिली आहे. शरीर, समाज, राष्ट्र, नीतिमूल्ये, धर्म, परंपरा, संस्कृती यांचे स्वास्थ्य केवळ मानसिक शुद्धी आणि आत्मचिंतन यातूनच साध्य होईल. जो समाज देशाप्रति, सामाजिक, नैतिक, धार्मिक, मूल्याप्रति जागरूक नाही, त्याचा विनाश निश्‍चित आहे. उपरोक्त सर्व दरोडेखोरांना देशाचा जागरूक नागरिक या नात्याने आचरण करणे व खर्‍या अर्थाने देशाचा नागरिक म्हणून आपली जबाबदारी समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. जो समाज आपल्या देशाशी व आपल्या देश बांधवांशी प्रामाणिक राहू शकत नाही, त्या देशात जंगलराज स्थापित व्हायला वेळ लागणार नाही. पैसा केवळ क्षणिक सुख देऊ शकतो, परम शांती आणि आत्मिक सुख देऊ शकत नाही, हे अंतिम आणि शाश्‍वत सत्य समजून घेऊन अनुभव करण्याची नितांत आवश्यकता आहे.

– सुनील पाटोळे,नागपुर
09776038850