सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा

0

जळगाव :: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राजर्षि शाहु महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने साजरा करण्यात आला. सकाळी साडेआठ वाजता जिल्हा परिषदेच्या विद्या निकेतन प्रांगणातून समता दिंडीला सुरुवात करण्यात आली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिंडीत आपला सहभाग नोंदविला होता. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ढोल, ताशाच्या गजरात लेझीम खेळत विविध प्रत्याशिके सादर केली.

सामाजिक कार्याची जागृती
समाजात स्त्री-भ्रुण हत्त्येविषयी समाजाच्या मानसिकतेत बदल होण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याने दिशा बहुउद्देशीय संस्थेने प्रचार रथ व पथनाट्य सादरीकरण केले. यामध्ये विनोद ढगे , दिपक पाटील, सचिन महाजन,दिपक परदेशी आदी कलाकारांचा समावेश दिंडीत अग्रभागी होता. समता दिडीं शहरातील शिवतीर्थ, महाराणा प्रताप चौक, स्वातंत्र चौक अशा प्रमुख मार्गाने घोषणा देत, मार्गक्रमण करीत जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहु महाराज सभागृहात पोहचल्यानंतर समता दिडींचा समारोप करण्यात आला.विनोद ढगे यांच्या चमूने येथे स्वच्छता अभियान, बेटी बचाव, बेटी पढावा आदी सामाजिक विषयांवर पथनाटय सादर केले.

मान्यवरांची उपस्थिती
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील यांनी सामाजिक समता दिडींला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौत्सुभ दिवेगांवकर, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त खुशाल गायकवाड, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी अनिता राठोड, शिक्षणविस्तार अधिकारी धाडी, मनपाचे सहाय्यक लेखाधिकारी चंद्रकांत वांद्रे यांचेसह शालेय विद्यार्थी-विद्यार्थ्यींनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
राजर्षि शाहु महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येते. त्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक न्याय दिन व राजर्षि शाहु महाराज जयंती साजरी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी राजर्षि शाहु महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करुन अभिवादन केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.