पिंपरी-चिंचवड : मोजता येणार नाहीत; एवढे कोट्यवधी रुपये खर्चून ग्रामीण भागातील गरीब व मागासवर्गीय समाजातील लोकांच्या मुलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून विविध सोयी, सुविधा दिल्या जात आहेत. परंतु त्याचे म्हणावे तितके ‘मार्केटिंग’ होत नाही. म्हणूनच सामाजिक न्याय विभागाचे कार्य दिसून येत नाही, अशी खंत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य समाजकल्याण विभागातर्फे मोशी, प्राधिकरण येथे उभारण्यात आलेल्या अडीचशे विद्यार्थी क्षमता असलेल्या मुलांच्या वसतिगृहाचे उद्घाटन नुकतेच राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
स्पाईन रोड येथे झालेल्या या कार्यक्रमाला सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर नितीन काळजे, आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, प्रादेशिक आयुक्त ए. बी. महाजन, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, बांधकाम व्यावसायिक अनिल फरांदे, अतिरिक्त आयुक्त सदानंद पाटील, माया ननावरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
नागरिकांची अनुपस्थिती खटकली
या कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती मात्र, कमी होती. त्यावर राजकुमार बडोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बडोले म्हणाले की, वसतिगृहाच्या उद्घाटनाला मंत्री, आमदार, महापौरांना बोलावले जाते. मात्र, लोकच येत नाहीत. हा आमच्या विभागचाच मागासलेपणा आहे. निदान विद्यार्थ्यांना तरी बोलवायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली. राजर्षि शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान विभूती केवळ एका समाजापुरत्या मर्यादित नव्हत्या आणि ठेवूही नये. यांनी सर्व समाजासाठी केलेल्या कार्यामुळेच आज गरीब, दलित, मागासवर्गीय विद्यार्थी शिकून पुढे जात आहे. म्हणूनच या व्यक्ती सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होत, असेही बडोले यांनी सांगितले.
50 स्मृतिस्थळांचा विकास
येत्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 50 स्मृतिस्थळांचा राज्य शासन विकास करणार असून, त्यातील 28 स्थळांचा विकास सुरू आहे. त्याचप्रमाणे निवडक दलित वस्त्यांचाही विकास करण्यात येणार आहे. बेरोजगारीचा प्रश्न पाहता कौशल्यावर आधारित शिक्षण देऊन मागसवर्गीय विद्यार्थ्यांचा औद्योगिक विकासही साधला जाणार आहे, अशी माहिती कार्यक्रमात बडोले यांनी दिली. राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रादेशिक आयुक्त ए. बी. महाजन यांनी प्रास्ताविक केले. माया ननावरे यांनी सूत्रसंचालन केले. तर, अतिरिक्त आयुक्त सदानंद पाटील यांनी आभार मानले.