सामाजिक बदल घडविण्यासाठी वृत्तपत्रांनी चळवळ उभारली पाहिज

0

जळगाव । सामाजिक बदल घडविण्यासाठी वृत्तपत्रांनी चळवळ उभारली पाहिजे. माध्यमांच्या पुढाकाराने समस्यांची उकल होण्यास मदत होते यातूनच समाज एकत्र येत आहे म्हणूनच पत्रकारांनी प्रसार माध्यमांच्या मदतीने समाजात बदल करत मेणबत्तीच्या मशाली कराव्यात असा सूर शहरातील विविध दैनिकातील संपादकांनी आज मू.जे महाविद्यालयात आयोजित पत्रकारिता विभागाच्या राष्ट्रीय परिषदेप्रसंगी काढला.

परिषदेचा घेतला आढावा
यावेळी व्यासपीठावर उमविच्या पत्रकारिता विभागातील डॉ.सुधीर भटकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरचे डॉ.बबन नाखले आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान परिषदेचा आढावा विभागप्रमुख डॉ. विनोद निताळे यांनी घेतला. भूमिका शहा (पुणे), रुपाली अलोने (वर्धा) यांनी परिषदेच्या आयोजनाविषयी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा पाटील व देवश्री जाधव यांनी तर आभार डॉ. गोपी सोरडे यांनी मानले.

यांची होती उपस्थिती
मू.जे महाविद्यालयात आयोजित प्रसार माध्यमे आणि सामाजिक बदल’ दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या दुसर्‍या दिवशी सकाळच्या सत्रात माध्यमांचा संपर्क’ या परिसंवादात मुंबई लोकमत आवृत्तीचे संपादक राहुल रनाळकर आणि जळगाव येथील विविध वृत्तपत्रांचे संपादक सहभागी झाले होते. यात दै.सकाळ’चे संपादक विजय बुवा, दै. दिव्य मराठीचे त्र्यंबक कापडे, दै.लोकमतचे मिलिंद कुलकर्णी व दै.जनशक्तीचे संपादक शेखर पाटील आदी सहभागी होते.

सध्याचे युग हे तंत्रज्ञानचे युग आहे व तंत्रज्ञान हे समाजात बदल घडविण्याचे काम करत असतात. यासाठी वृत्तपत्र हे वास्तवाला कल्पनेचे पंख लावणारे हवे. वृत्तपत्रात काम करताना आपण सोशल मिडियाचा वापर केला पाहिजे. वृत्तपत्र व सोशल मिडियाची व्यवस्थित सांगड घातली तर सामाजिक बदल सहज शक्य आहे. म्हणूनच आजच्या युवकांनी डिजिटल इंडियाकडे पाऊल उचलून काम करावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. -शेखर पाटील, संपादक, दै. जनशक्ति