सामाजिक बांधिलकीच्या भावनेने वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी व्हावे

0

जळगाव । पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात उद्दिष्टपूर्तीसाठी नव्हे तर सामाजिक बांधिलकीच्या भावनेने सर्वांनी सहभागी होऊन जिल्हयात हा कार्यक्रम यशस्वी करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले. चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत जिल्हयात सुरु असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस कौस्तुभ दिवेगावकर, रेड्डी, यावल चे एस. एस. दहिवले, जितेंद्र पाटील, संतोष पाटील, विशाल जाधवर उपस्थित होते.

लागवडीसाठी 23 लाख 66 हजार 993 खड्डे
राज्यात येत्या तीन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत यावर्षी 4 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यासाठी जळगाव जिल्हयाला 20.89 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये ग्रामपंचायतींना 4.31 लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले असून प्रत्यक्षात 4.48 लाख वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. तर वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागास 14.40 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यांनी 17.15 लाख वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. तर इतर विभागांनी 2.03 लाख वृक्ष लागवडीचे नियोजन केले असून जिल्हयात आतापर्यंत वृक्ष लागवडीसाठी 23 लाख 66 हजार 993 खड्डे तयार असल्याची माहिती उपवनसंरक्षक रेड्डी व दहिवले यांनी बैठकीत दिली. 1 ते 7 जुलै या कालावधीत जिल्हयात अधिकाधिक वृक्ष लागवड होण्यासाठी शासकीय यंत्रणांना मोफत रोपे देण्यात निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी यावेळी दिली.

मनपास 5 हजाराचे लक्ष
जळगाव महाराष्ट्र शासनाने राज्यात 4 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्टानुसार दुसर्‍या वर्षी जळगाव शहराला 5 हजार वृक्ष लागवडीचे लक्ष देण्यात आले आहे. महानगर पालिकेकडे 447 नागरिकांनी रोपांची मागणीचे अर्ज दिले आहेत. महापालिका प्रशासनाने शहरात 78 ठिकाणांची वृक्षरोपणासाठी निवड केली आहे. या ठिकाणी खड्डे तयार करण्याचे काम सुरू आहे. याव्यतिरिक्त 2 हजार रोपे अतिरिक्त खरेदी करून ती वितरीत करण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे वृक्ष लागवडीचे तयारी पूर्ण करण्यात येत आहे. तरी ज्या नागरिकांना वृक्ष लागवड करावयाची असेल त्यांनी महानगरपालिकेत संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

येथून मिळणार रोपे
तालुकानिहाय शासकीय यंत्रणांना रोपे उपलब्ध होण्यासाठी रोपवाटिका व समन्वयक निश्चित करण्यात आले असून त्यांची माहिती पुढीलप्रमाणे- जळगाव तालुका-मेहरुण, जामनेर- शेवगा, एरंडोल/धरणगाव- खडका, पाचोरा-मोहाडी, भडगांव-वाघूलखेडा, पारोळा/अंमळनेर-वाघ्रा, मुक्ताईनगर-चारठाण, चाळीसगाव-बिलाखेड, बोदवड/भुसावळ-साळशिंगी, रावेर-पाल, गारबर्डी, यावल-यावल, नागादेवी, चोपडा-लासूर, बोर अंजटी, वैजापूर, कर्जाना, उनपदेव या रोपवाटीकामधून रोपे मिळणार आहे. त्यानुसार तालुक्यातील शासकीय यंत्रणांना त्यांना दिलेल्या उद्दिष्टानुसार लागणारी रोपे या रोपवाटिकामधून देण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली.