भुसावळ : कोरोना या संसर्गजन्य आजाराने शहरातून आता तालुक्यातही शिरकाव केला आहे त्यामुळे तालुक्यातील नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी जिल्हा परीषद आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांना हॅण्डग्लोजसह मास्क व सॅनिटायझरचा पुरवठा केला असून आणखी काही मदत लागल्यास मी आपल्या पाठीशी असल्याचे वचन वैद्यकीय कर्मचारी व अधिकार्यांना दिले आहे.
जि.प.सदस्यांचे सामाजीक दायीत्व
शहरात 25 एप्रिलपासून कोरोनाने थैमान घातले आहे तर वरणगाव शहरासह खडका, टहाकळी, तळवेल, कंडारी, दीपनगर आदी परीसरातही शिरकाव केला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील कंटेंन्मेंट झोन परीसरातील नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्हा परीषदेच्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता पांढरे यांच्यासह इतर कर्मचार्यांना संरक्षण म्हणून जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी 500 हॅण्डग्लोज व एक हजार फेस मास्क व सॅनिटायझर या साहित्याचा पुरवठा केला आहे.
यांची होती उपस्थिती
शुक्रवारी बद्री प्लॉटमधील नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये हे साहित्य देण्यात आले. यावेळी जिल्हा परीषद आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ.प्रमोद पांढरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता पांढरे, डॉ.रुपाली सावकारे व नगरसेवक पिंटू कोठारी उपस्थित होते. संपूर्ण तालुक्यांमध्ये ही आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याने कर्मचार्यांना दिलासा मिळाला आहे.