सामाजीक दायीत्व : यावल फैजपूर व्यापारी मंडळातर्फे गरजूंना अन्न-धान्याचे वाटप

0

यावल : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 3 मे पर्यंत लॉक उाऊन व संचारबंदी सुरू असल्याने या कठीण संकटसमयी मोलमजुरी करून हातावर पोट भरणार्‍या गोर-गरीबांची कामे पूर्णपणे बंद असल्या कारणाने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. यासाठी अनेक सामाजिक संस्था मदतीचा हात घेऊन पुढे सरसावल्या आहेत. यावल-फैजपूर व्यापारी मंडळातर्फे यावल तहसील कार्यालयामध्ये गरजूंना अन्नधान्य वाटप व्हावे या सामाजिक दृष्टिकोनातूनच व्यापारी मंडळाच्यावतीने धान्य साठा उपलब्ध झाला असून विविध ठिकाणी मागणीनुसार गोर-गरीबांना धान्य वाटप करण्यासाठी देण्यात येत आहे.

सातपुड्यातही वाटप झाले धान्य
यावल तालुक्यातील किनगाव येथील उप प्राथमिक केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी व निरभ्र निर्भय फाउंडेशन भुसावळच्या संस्थापक डॉ.मनीषा महाजन, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतातील अतिदुर्गम भागात मोलमजुरी करून जीवन जगणार्‍या 30 आदिवासी कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तू वाटप केल्या जात आहेत. यावेळी यावल तहसील कार्यालयातील व्यापारी मंडळाकडून मदतीसाठी मिळालेल्या गहू मधून तीन क्विंटल धान्य देण्यात आले.जीवनावश्यक वस्तू सातपुड्यातील दुर्गम भागात असलेल्या सांगयादेव व माथन या पाड्यावरील राहणार्‍या सुमारे 100 आदिवासी लोकांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती उप प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन यांनी दिली आहे. निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन त्यांच्यासोबत असलेले परीचारक देशपांडे व वाहन चालक कुरबान तडवी यांच्याकडे आवश्यक असलेले धान्य दिले.