सामान्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यास कटिबद्ध : अतुल म्हस्के

0

पुरंदर । शासन हे सर्वसामान्य नागरिकांचे असते आणि त्यांचे हक्क मिळण्यासाठी शासकीय स्तरावरून नियमीत पाठपुरावा सुरू असतो. तरीही सर्वांनाच लाभ मिळणे शक्य होत नाही. त्यामुळे काही घटकांचा शासकीय व्यवस्थेवरील विश्‍वास उडाला आहे. जनतेचा शासनावरील विश्‍वास कायम राहावा. शासन ठराविक एका लोकांचेच आहे हा गैरसमज दूर होण्यासाठी यापुढील काळात गावागावांमध्ये विविध शासकीय योजनांच्या माध्यामातून सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळवून देण्यात येईल, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के यांनी केले आहे.

पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथे महसूल व वन विभाग, पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराजस्व अभियान अंतर्गत विस्तारित समाधान योजना अर्थात शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री दत्त मंदिरातील नारायण महाराज यावेळी प्रमुख म्हणून उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय काळे, दिलीप यादव, रमेश जाधव, संजय आसवले, सचिन गिरी, आदींसह नागरीक मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.

मोफत गॅस जोड
प्रांताधिकारी संजय आसवले यांनी यावेळी 17 गावांतील सुमारे 3987 नागरिकांना विविध योजनेच्या माध्यमातून लाभ मिळून दिल्याचे सांगितले. 450 व्यक्तींची आरोग्य तपासणी, 200 व्यक्तींना चष्मे वाटप, 827 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, 700 कुटुंबाना रेशनकार्ड वाटप, त्याचप्रमाणे एमएसईबीच्या माध्यमातून वीज जोड, वनविभागाच्या माध्यमातून मोफत गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. तसेच विविध शासकीय दाखले आणि प्रमाणपत्र, कृषी साहित्य आणि औजारे वाटप करण्यात आले, अशी माहिती दिली. त्याचप्रमाणे वनविभागाकडून बायोगॅससाठी फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पुढील काळात वनविभागाच्या अधिकार्‍यांनी गांभीर्याने घ्यावे, अशी सूचना केली.

योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
गावागावांतून हा उपक्रम राबविल्याने शासनाचा मोठा ताण कमी होऊन नागरिकांना आपल्या गावातच योजनांचा लाभ घेणे शक्य होणार असल्याचे म्हस्के यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. नवनवीन लाभाच्या योजना राबविल्या जातात. या योजनांचा पाठपुरावा करून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यांनी केले.