मुंबई – आज महाराष्ट्रातील प्रत्येकाला काहींना काही तरी समस्या आहेत आणि या समस्या घेऊन नागरिक महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आपल्या व्यथा मंत्र्यांसमोर मांडण्यासाठी मंत्रालयात येत असतात. या पीडित आणि त्रासलेल्या नागरिकांना लवकरात लवकर मंत्र्यांना भेटता यावे यासाठी मंत्रालयात मंत्र्यांना भेटण्याची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत केली तर समस्या लवकरात लवकर मंत्र्यांपर्यंत पोहोचतील आणि नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागणार नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातून विविध समस्या घेऊन मंत्रालयात येणारे काही कमी नाहीत. सकाळपासून ताटकळत आपापल्या समस्या घेऊन हे नागरिक लाईनमध्ये उभे असतात. त्यामध्ये लांब लांबवरचा प्रवास करून आलेली वृद्ध माणसे देखील असतात. त्यानंतर कुठे दुपारी 3 च्या नंतर या नागरिकांना मंत्रालयाच्या आत सोडण्यात येते. मात्र सकाळपासून थकली भागलेली माणसे पार वैतागलेली असतात. मंत्री मात्र दुपारी आरामात येऊन एअरकंडीशनची हवा खात बसलेली असतात. न्यायासाठी नागरिकांना असे ताटकळत बसावे लागत असेल तर जनतेने काय करावे. हा महत्त्वाचा धागा पकडूनच सामाजिक कार्यकर्ते प्रदिप भालेकरांनी मुख्यमंत्र्यांकडे मंत्र्यांची भेटीची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 करण्याची मागणी केली आहे.