पुणे : सामान्य जनतेला प्रगती आणि विकास समजावण्याचे कार्य अभिजात दृश्य कलेतून होते. कला ही रचनात्मक असेल तर समाज हा प्रगल्भ आणि क्रियाशील होतो, असे प्रतिपादन जगविख्यात जेष्ठ कलाकार रवी परांजपे यांनी आज येथे केले.
जळगाव येथील के. सी. ई. सोसायटी संचलित ओजस्विनी दृश्य व ललित कला विभागातील विद्यार्थ्यांकडून आयोजित स्वरुप कला प्रदर्शन २०१७ चे उद्घाटन कार्यक्रमात श्री. परांजपे बोलत होते. हे प्रदर्शन बालगंंधर्व कलादालनात सुरु झाले असून ते दि. २१ ते २४ अॉगस्ट दरम्यान रोज सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यं सुरु राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. नितीन करमळकर होते. स्वरुप कला प्रदर्शनाचे दीपप्रज्ज्वलन करुन उद्घाटन श्री. करमळकर, श्री. परां जपे यांनी केले.
कोणतीही कला ही पूर्वी उच्च गटासाठी होती. त्यामुळे सामान्य लोकांपर्यत समाजातील बदलाचे विचार पोहचले नाहीत. अशाने लोकशाही कमकूवत झाली. कलेच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रात रचनात्मक कार्य करुन अभिजात समाज निर्माण करता येतो,असे ही श्री. परांजपे म्हणाले. कलानिर्मिती ही प्रामुख्याने वारसा घेवून निर्माण होते. कोणाचा तरी प्रभाव असतो. प्रभावातून कलाकाराची परंपरा निर्माण होते. परंपरा निर्माण झाली की सिद्धी प्राप्त होते. अशी सिद्धी प्राप्त झाली की त्या कलाकाराचा वारसा तयार होतो असेही श्री. परांजपे यांनी समजून सांगितले.
प्रा. डॉ. कुलगुरु करमळकर म्हणाले की, मला घरातून वडिलांकडून कलेचा वारसा होता. त्यामुळे विज्ञानाकडे जाण्यापूर्वी मी सुध्दा कलेचा कुंचला हाती घेतला होता. पण त्यातून पुढे चरितार्थ होणार नाही असे समजून मी विज्ञानाकडे वळलो. जळगावातून येवून पुण्यात कलाप्रदर्शित करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ कलाकार रमेश लाहोटी, अजित वर्तक आणि सुनील भीडे हेही उपस्थित होते. या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत ओजस्विनी कला विभागाचे प्राचार्य अविनाश काटे यांनी केले. प्रदर्शन संयोजनाची भूमिका प्रास्ताविकात सांगून सूत्रसंचालन दिलीप तिवारी यांनी केले. आभार सुभाष तळेले यांनी मानले.
असे आहे प्रदर्शन …
स्वरुप कला प्रदर्शनात ओजस्विनीच्या १०८ विद्यार्थ्यांची १४५ चित्रे आहेत. यात रिअल, ॲबस्ट्रैक, कम्पोझिशन, म्युरल, प्रिंट या प्रकारातील तैल, जल व इंक रंगातील चित्रे आहेत. ही चित्रे पाहून खरेदीही करता येणार आहेत.
परांजपे यांच्या विद्यार्थ्यांशी गप्पा …
रवी परांजपे तब्बल ४ तास प्रदर्शनात रमले. त्यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. अभिजित कला आणि रचनात्मक कला काय असते हे त्यांनी स्पष्ट केले. प्रदर्शनातील अनेक चित्रांचे कौतुक त्यांनी केले. मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांनी प्रत्येकाच्या चित्राजवळ जावून फोटो काढले.
के. सी. ई. चा गौरव
ओजस्विनीच्या विद्यार्थ्यांचे कला प्रदर्शन पुण्यात आयोजित करण्याचा हा प्रयत्न निश्चित वेगळा आहे. बहुधा हा भारतातील असा पहिला प्रयोग असावा असेही श्री. परांजपे म्हणाले.