पिंपरी-श्री आदि जांबमुनी सेवा समाजातर्फे सलग दुस-या वर्षी आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात १५ वधूवर बोहल्यावर चढले. मोठ्या दिमाखात हा विवाहसोहळा संपन्न झाला. १५ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. चिंचवड, मोहननगर येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवनात रविवारी हा सामूदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, सोलापूर महापालिकेचे माजी महापौर संजय येलगंडी, स्थायी समितीचे माजी सभापती देवेंद्र भंडारी, श्री आदि जांबमुनी सेवा समाजाचे अध्यक्ष मारुती पंद्री, कृष्णा संजय, पिंपरी पालिकेचे माजी नगरसेवक मारुती भापकर, प्रसाद शेट्टी आदी उपस्थित होते.
गेल्या १५ दिवसांपासून या विवाहसोहळ्याचे नियोजन केले होते. रविवारी सकाळपासूनच विवाहस्थळी व-हाडी मंडळी व वधूवर येत होते. चिंचवड येथील आनंदगर ते मोहननगर येथील जिजाऊ सांस्कृतिक भवनापर्यंत वधू-वरांची बग्गीतून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास विधीवत पद्धतीने मोठ्या दिमाखात विवाहसोहळा संपन्न झाला.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”सध्याच्या महागाईच्या काळात गोरगरिबांना मुलांची लग्न करणे परवडत नाही. मारुती पंद्री यांनी समाजातील सर्वांना सोबत घेऊन सामूदायिक विवाहसोहळ्यात १५ जोडप्यांचा विवाह लावून दिला ही कौतुकाची बाब आहे. समाजाच्या उन्नीतासाठी पंद्री हे काम करतात. नवीन वधू-वरांना त्यांचे वैवाहीक आयुष्य सुख-समुध्दीचे जावो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. पंद्री यांनी हे काम अविरतपणे सुरु ठेवावे, अशी अपेक्षाही खासदार बारणे यांनी व्यक्त केली.
मारुती पंद्री म्हणाले, ‘आजच्या स्पर्धात्मक युगात पैसे व वेळेला अनन्य साधारण महत्व आहे. विवाहसारख्या प्रथेत पैशाचा व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आणि विवाह हा दोन जीवांच्या मिलनाचा मंगलमार्ग या मार्गापर्यंत पोहोचणे पालकांच्या दृष्टीने अतिशय कठिण प्रवास झाला आहे. हा प्रवास सुखरुप करण्यासाठी तसचे आपल्या समाजाने एकत्र यावे यासाठी सामूदायिक विवाह सोहळा उपक्रम सुरु केला आहे. पैसा व वेळेची बचत, तसेच समाजाला एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या सोहळ्याचे यंदाचे हे दुसरे वर्ष असून भविष्यात ही परंपरा कायम ठेवणार आहे.