सामुहिक बलात्कार करत पिडीतेला जाळले

0

उन्नाव : गेल्याकाही दिवसात देशात पुन्हा एकदा बलात्काराच्या घटना वाढल्या आहे. हैद्राबाद येथील महिला पशुसेवक डॉ. प्रियंका रेड्डी बलात्कारानंतर जाळून मारल्याची घटनेला काही दिवसच लोटले असताना उन्नावमध्ये एका सामूहिक बलात्कार पीडितेला पेट्रोल टाकून जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण उन्नाव हादरले आहे. पीडितेला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पीडिता आज (गुरुवारी) पहाटे चार वाजता रायबरेलीला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी बैसवारा बिहार रेल्वे स्थानकात जात असताना ही घटना घडली. गौरा फाट्यावर गावातील हरिशंकर त्रिवेदी, किशोर शुभम, शिवम, उमेश यांनी पीडितेला घेरले आणि तिच्या डोक्यावर काठी आणि गळ्यावर चाकूने वार केले. दरम्यान, चक्कर आल्याने पीडिता खाली कोसळली. त्यानंतर या सहा जणांनी तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले, अशी माहिती पीडितेने दिली आहे. पीडितेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास रायबरेली पोलिसांनी केला होता. या प्रकरणाचा हे आरोपी जामिनावर सुटले आहेत.

पीडितेला जाळल्यानंतर तिचा आरडाओरड ऐकून लोक धावून येत असल्याचे पाहून आरोपींनी तेथून पलायन केले. यापूर्वी याच सहा जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने सांगितले. या घटनेची माहिती मिळताच डीएम देवेंद्र पांडे, एसपी विक्रांत वीर यांच्यासह अनेक पोलिस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पीडितेने ५ आरोपींची नावे दिली आहेत. यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तिघांचीही चौकशी केली जात आहे. इतर दोघांचा शोध सुरू आहे, अशी माहिती उन्नावच्या पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.