सामूहिक अत्याचार ; तिसर्‍या आरोपीची ओळख परेड

0

यावल- तालुक्यातील बामणोद येथील युवतीवरील सामूहिक अत्याचार प्रकरणातील तिसर्‍या संशयीत आरोपीची शनिवारी ओळख परेड घेण्यात आली. या गुन्ह्यात तिसरा संशयीत आरोपी म्हणून यश विजय अडकमोल (20) असून त्याची येथील तहसीलदार यांच्या बंद दालनात निवासी नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी आर.के.पवार यांच्यासमोर ओळख परेड घेण्यात आली. संशयीतास यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे त्यामुळे या सामूहिक अत्याचार प्रकरणातील आतापर्यंत अटकेतील संशयितांची संख्या तीन झाली असून दोघांची ओळख परेड यापुर्वीच झालेली आहे.

दोघा आरोपींना 9 पर्यंत पोलिस कोठडी
यापूर्वीच पोलिस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडीत असलेल्या आकाश बिर्‍हाडे व निलेश सपकाळे यांना शनिवारी यावल न्यायालयाचे न्या.डी.जी.जगताप यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता त्यांना 9 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकारतर्फे अ‍ॅड.नितीन खरे यांनी युक्तीवाद केला. दरम्यान, अटकेतील तिसर्‍या संशयितास 9 मे रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे. तिसरा संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तालुक्यातील बामणोद येथील 22 वर्षीय युवतीवर 8 व 9 एप्रिल रोजी शहरातील एका ठिकाणी अत्याचार केला होता. आतापर्यंत पोलिसांनी यावल येथील आकाश बिर्‍हाडे, निलेश सपकाळे यांच्यासह यश अडकमोल अशा तीन संशयितांना तपासाधिकारी तथा पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी, फौजदार सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे यांच्या पथकाने अटक केली आहे. शहराबाहेरील दोघे संशयित पोलिसांच्या पटलावर आहेत. त्यांचा शोधही तपास पथक घेत आहे. 8 ते 12 एप्रिल दरम्यान युवतीवर यावलसह भुसावळ, बर्‍हाणपूर येथे अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणी घेण्यात आलेल्या ओळख परेडचा गोपनीय अहवाल तहसीलदार कार्यालयाकडून न्यायालयात सादर करण्यात येईल, असे निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांनी सांगितले.