नवी दिल्ली-बुराडी सामूहिक मृत्यू प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत २०० पेक्षा जास्त जणांची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. एकाच कुटुंबातील ११ जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील बुराडी भागात उघड झाली. तसेच या प्रकरणात आत्तापर्यंत २०० पेक्षा जास्त लोकांची चौकशी झाल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा फायनल पोस्टमॉर्टम रिपोर्ट यायची पोलीस वाट पाहात आहेत.
भाटिया कुटुंबाने ही आत्महत्या मोक्षप्राप्तीसाठी केली अशी माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. या आत्महत्या करण्यासाठी ज्या ललित भाटियाने सगळ्यांना तयार केले तो ललित भाटिया दररोज हॉरर शो आणि सिनेमा पाहात असे, तसेच पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटीवर त्याचा विश्वास होता असेही समोर आले आहे.
आत्महत्या केलेल्या ११ जणांपैकी प्रियांकाचा भाटियाचा साखरपुडा झाला होता. प्रियांकाचा जो होणारा नवरा आहे त्याची या संदर्भात पोलिसांनी कसून चौकशी केली. या सामूहिक आत्महत्यांबाबत त्याला काय माहित होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हे कुटुंब खूपच धार्मिक होते त्यांनी या आत्महत्या का केल्या ते आपल्याला ठाऊक नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
प्रियांकाच्या पत्रिकेत मंगळ होता त्यामुळेच तिचे लग्न लवकर जमले नव्हते अशीही माहिती पोलिसांना समजली आहे. मात्र गेल्या महिन्यात तिचा साखरपुडा झाला होता आणि या वर्षाखेरीस तिचे लग्न होणार होते असेही पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांना या घटनेच्या आदल्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेजही सापडले आहे. या फुटेजमध्ये भाटिया कुटुंबीय स्टूल आणताना दिसले. तसेच पोलिसांना घरात ११ डायरीही सापडल्या ज्यामध्ये मोक्षप्राप्तीसाठी मृत्यू हाच उपाय असल्याचे लिहिल्याचीही माहिती पोलिसांनी दिली.