कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर भारती सोनवणे यांचे आवाहन : मनपात मुस्लीम बांधव, मौलानांची घेतली बैठक
जळगाव: राज्यासह देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत आहे. दक्षतेचा उपाय म्हणून शासन आणि प्रशासनाकडून गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनाला दूरच ठेवण्यासाठी मुस्लीम बांधवांनी देखील सहकार्य करावे. दररोज मस्जिदमध्ये नमाज पठण करताना स्वच्छतेचे योग्य उपाय योजावे असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपात महापौर भारती सोनवणे यांनी शहरातील सर्व मुस्लीम धर्मगुरू, प्रमुख मुस्लीम बांधव आणि मौलानांची बैठक बोलावली होती. यावेळी महिला व बालकल्याण सभापती शोभा बारी, नगरसेवक कैलास सोनवणे, रियाज बागवान, ईबा पटेल, नवनाथ दारकुंडे, सदाशिव ढेकळे यांच्यासह गफ्फार मलिक, करीम सालार, अॅड.जमील देशपांडे, शाहिद शेख, फारुख कादरी आदींसह मुस्लीम धर्मगुरू मुफ्ती अतिकुरहेमान, मौलाना सलीक, ज़िया बागवान, डॉ.अल्तमश शेख, शरीफ शाह, सय्यद चांद, जमिल शेख़, अनिस शाह, जफर शेख व मौलाना
उपस्थित होते.
महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले की, देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. जळगाव शहर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. देशातील अनेक प्रमुख धार्मिकस्थळांवर जाण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. मुस्लीम बांधवांनी देखील नमाज अदा करताना योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन केले.नगरसेवक कैलास सोनवणे म्हणाले की, कोरोना व्हायरस कोणताही जात, धर्म पाहत नाही, त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी आणि इतरांना देखील सांगावे, असे आवाहन केले.
सार्वजनिक रुमाल वापरावर बंदी
मुस्लीम बांधव नमाज अदा करण्यापूर्वी हात, पाय धुवून वजू करतात. त्यानंतर एका सार्वजनिक रूमालाचा उपयोग करून ते हातपाय पुसतात परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो रुमाल न वापरता प्रत्येकाला आपापला रुमाल वापरण्याचे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती माजी उपमहापौर करीम सालार यांनी दिली. गफ्फार मलीक यांनी ना राम आयेंगे, ना रहीम आयेंगे, इन्सान ही, इन्सान के काम आयेंगे हा शेर ऐकवित कोरोनापासून बचाव करण्यासाठी स्वतःची मनस्थिती मजबूत करावी. ईश्वर, खुदाचे स्मरण करावे असे आवाहन केले.
नूतन आयुक्तांचे महापौरांकडून स्वागत
मनपाचे नूतन आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. मुस्लीम बांधवांची बैठक सुरू असलेल्या ठिकाणी त्यांनी देखील भेट दिली. यावेळी महापौर भारती सोनवणे यांनी आयुक्त सतिष कुलकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.