रावेर । गेल्या वर्षी पालिकेने घेतलेल्या परिश्रमामुळे केंद्रीय समितीने रावेर शहराला नुकतेच हागणदारीमुक्त घोषित केले होते. या कामाची दखल घेत जळगाव महानगरपालिकेत झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात तत्कालिन मुख्याधिकारी राहूल पाटील यांना गौरवण्यात आले. लोकप्रतिनिधी आणि लोहसहभागातून हा बदल घडविणे शक्य झाले असल्याचे मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले.
विविध उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये केली जनजागृती
सार्वजनिक मॉडेल शौचालय उभारणी, उघड्यावर शौचास बसणार्यांवर कारवाई, शहरातील सर्व मशिदींच्या मौलवींकडून शहर स्वच्छ राखण्यासाठी आवाहन करणे, ड्रोन कॅमेरा वापरून उघड्यावर शौचास बसणार्यांवर चाप असे निरनिराळे प्रयोग करून पालिकेने रावेर शहर हागणदारीमुक्त केले. तालुकास्तरीय कमिटीने 18 मे, जिल्हास्तरीय कमिटीने 11 फेब्रुवारी आणि केंद्रीय समितीने जून महिन्यात पाहणी केली. यानंतर निरंतर पाहणीनंतर शहर हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर झाले होते. यासाठी तत्कालिन मुख्याधिकारी राहूल पाटील, विद्यमान मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे यांना जळगाव महापालिकेत झालेल्या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. मंत्रालयातील नगरविकास विभागाचे उपसचिव सुधाकार बोबडे, स्वच्छ भारत अभियानाचे डॉ.उदय टेकाडे, स्वच्छ भारत मिशनचे ओएसडी विजय सनेर यांच्याहस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. पालिकेला देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे सचिव डॉ.रवीसिंग, आदिल झैनुल यांच्या स्वाक्षर्या आहेत. स्वच्छ भारत मिशनमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे पालिकेला दीड कोटीचा अतिरिक्त निधी मिळणार असल्याचे तत्कालिन मुख्याधिकारी राहूल पाटील यांनी सांगितले.