सामूहिक बलात्काराचा निषेध

0

वर्धा/नाशिक । कठुआ येथे अल्पवयीन मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले. शहरातही राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने कँडल मोर्चा काढून या घटनेचा निषेध करतानाच आरोपींना फासावर लटकावण्याची मागणी केली. यावेळी संतप्त महिलांनी या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालणार्‍या भाजप सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी रात्री भगूर येथे हा मोर्चा काढण्यात आला. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आहे आणि देशात असुरक्षितेचे वातावरण पसरले आहे. कठुआ आणि उन्नाव या दोन्ही घटना माणुसकीवर काळिमा फासणार्‍या असून यातील सर्व आरोपींना भर चौकात फाशी देण्यात यावी, अशी मागणी प्रेरणा बलकवडे यांनी यावेळी केली. देशात बलात्काराच्या घटना वाढत चाल्या असून सरकार त्यांना जलदगती न्यायालयात खटला चालवून शिक्षा देण्याचे आश्‍वासन देते पण या प्रकरणांना वर्षांनुवर्षे न्याय मिळत नाही. त्यामुळे समाजात असे नीच नराधम लोकांची हिमंत वाढत असल्यााचा आरोप या महिला आंदोलकांनी केला.

संपूर्ण देशातून संतापाची भावना व्यक्त
अशा प्रकारच्या बलात्कार प्रकरणातील आरोपींना अटक झाल्यानंतर तात्काळ फाशी देण्यात यावी, अशी मागणी देखील यावेळी बलकवडे यांनी केली. या कँडल मोर्चा मध्ये महिलांनी आसिफाला न्याय द्या, बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, अशा मागणीचे फलक घेऊन सरकारचा निषेधही केला आणि मोर्चाच्या शेवटी पीडित आसिफाला श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रकरणाविषयी संपूर्ण देशातून संतापाची भावना व्यक्त होत असताना आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या सात संशयित आरोपींविरुद्ध न्यायालयाने कडक कारवाई करीत मुख्य आरोपीला भर चौकात फाशी देण्याची मागणी यावेळी जिल्हाध्यक्षा बलकवडे यांनी केली. या मार्चमध्ये देवळाली कॅम्प शहराध्यक्षा सायरा शेख, बीना हांडा, भारती बलकवडे, पूनम बर्वे, सुलताना शेख, मंगल भालेराव, कमळा कदम, नूरजहाँ मन्सुरी, रझीया शेख, परवीन सय्यद आदी सहभागी झाल्या होत्या.

वर्धात शेकडो नागरीक उतरले रस्त्यावर
वर्धा । जनतेच्या रक्षणासाठी असलेले सरकार बलात्काराच्या आरोपींना पाठीशी घालत आहे, त्यामुळे आता रक्षकच भक्षक झाल्याची टीका महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांनी केली. उन्नाव, कठुआ बलात्कार प्रकरणांविरोधात महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांनी शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत शहरातील बजाज चौकातून कँडल मार्च काढत निषेध नोंदविला. बजाज चौक ते शिवाजी चौकपर्यंत काढण्यात आलेल्या कँडल मार्चमध्ये महिलांसह नागरिकांची उपस्थिती होती. दरम्यान या बलात्काराच्या आरोपींना सरकार पाठीशी घालत असून सरकारने आरोपींना अटक करत फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही यावेळी चारुलता टोकस यांनी केली. या घटनेच्या निषेधार्थ जळगाव शहरात समाजवादी पार्टी जळगावच्या वतीने उद्या रविवार रोजी सायंकाळी 7 वाजता सागर पार्क मैदान ते काव्यरत्नावील चौक दरम्यान एक कॅन्डी मार्चचे आयोजन लोकशाही मार्गाने करीत आहे. यावेळी सामाजिक व राजकिय संघटनांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक समाजवादी पार्टीतर्फे करण्यात आले आहे.