नवी दिल्ली । सायबर सिटी गुरुग्राममधील मानेसर येथे 9 महिन्यांच्या चिमुकलीची हत्या व तिच्या आईवर सामूहिक बलात्कार प्रकरणाचा लवकरच पर्दाफाश करण्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागापासून अनेक पोलीस ठाण्याची पथके कार्यरत केली आहेत. गुरुग्रामच्या मानेसर परिसरात 29 मे रोजी 9 महिन्याच्या चिमुकलीला ऑटोमध्ये बसलेल्या तीन लोकांनी ऑटोमधून बाहेर फेकले होते व यामध्ये तिचा मृत्यू झाला होता. चिमुकलीला ऑटोमधून फेकल्यानंतर नराधमांनी तिच्या आईवर सामूहिक बलात्कार केला होता. महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तिन्ही ओरापींची रेखाचित्र प्रसिद्ध करण्यात आली आहेत. आता आशा व्यक्त केली जात आहे की, तिन्ही नराधम लवकरच पोलिसांच्या ताब्यात असतील.
23 वर्षीय पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, 29 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पतीसोबत वाद झाल्याने ती आपल्या 9 महिन्यांच्या मुलीला सोबत घेऊन आपल्या माहेरी खांडसा गावाकडे जात होती.
महिलेने एक ऑटोरिक्षा थांबवली. त्यामध्ये आधीपासूनच तीन लोक बसले होते. ती ऑटोमध्ये बसताच तीन आरोपींनी तिची छेडछाड करायला सुरुवात केली. महिलेने विरोध केला आणि त्यादरम्यान तिच्या मुलीनेही रडायला सुरुवात केली. मुलीला रडताना पाहून व तिचा आवाज बंद करण्यासाठी आरोपींनी मुलीला बाहेर फेकले. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. मुलीला बाहेर फेकल्यानंतर तिघांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला.