सामूहिक विवाह सोहळा काळाची गरज!

0

एरंडोल । मुलगी अथवा मुलाच्या विवाहासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जात असल्यामुळे कर्जबाजारीपणा वाढत आहे. त्यामुळे सर्व समाजात सामुहिक विवाह ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. श्रीसाई गजानन संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामुहिक विवाह कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध समाजातील आठ जोडप्यांचा सामुहिक विवाह करण्यात आला. सर्व राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी राजकीय मतभेद दूर ठेवून कार्यक्रमास उपस्थित असल्याबद्दल उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमास कोणीही अध्यक्ष नव्हता, तर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी कार्यक्रमाचे अध्यक्ष असल्याचे यावेळी आयोजकांतर्फे जाहीर करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतिष पाटील यांनी सुंदर गीत सादर करून वधूवरांना आशिर्वाद दिले.

मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
यावेळी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी विवाह समारंभावर होणार अनावश्यक खर्च टाळावा, असे आवाहन केले. सर्व समाजात मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत कमी असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. शेतकरी, खासगी व्यवसाय करणारे युवक यांना मुलगी देण्यासाठी पालक नकार देतात, सर्वांना नोकरी करणारा जावई हवा असतो मात्र सर्वांना नोकर्‍या कोठे मिळतात, त्यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली असणार्‍या खासगी व्यावसाईकास देखील मुलगी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावे आमदार डॉ. सतिष पाटील यांनी साई गजानन संस्थानच्या वतीने सामुहिक विवाहाचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे सांगितले.

सर्व पक्षीय पदधिकारी एकाच व्यासपिठावर
राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विवाह सोहळ्यावर परिस्थिती नसतांना देखील मोठ्या प्रमाणावर अनावश्यक खर्च केला जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. यावेळी विवाह समारंभात वापरण्यात येणार्‍या अक्षताचा अर्थ ‘अ’ म्हणजे अर्पण, ‘क्ष’ म्हणजे क्षमा व ‘ता’ म्हणजे तारतम्य असा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढील वर्षी संस्थानने मोठ्या प्रमाणावर सामुहिक विवाहाचे आयोजन करावे असे आवाहन त्यांनी केले. आमदार डॉ. यांनी राजकीय व सामाजिक विषयांवर अत्यंत विनोदी शैलीत भाषण करून उपस्थिताना मनमुराद हसविले.

संसारोपयोगी वस्तूचे वाटप
जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सामुहिक विवाहासाठी लागणार्‍या संपुर्ण खर्चाची जबाबदारी स्वीकारणार्‍या युवा उद्योजक विनित मोरे व त्यांच्या पत्नी कल्याणी मोरे यांचा आमदार डॉ. सतिष पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. सामुहिक विवाहात सहभागी झालेल्या वधूवरांना संस्थानच्या वतीने कपडे व संसार उपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आले. यावेळी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते. नायब तहसीलदार विलास मोरे यांनी सुत्रसंचलन केले. संस्थानचे अध्यक्ष बापू मोरे यांनी प्रास्तविक केले.

यांची लाभली उपस्थिती
कार्यक्रमास भाजपाचे विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, नगराध्यक्ष रमेश परदेशी, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, माजी आमदार चिमणराव पाटील, आजी नगराध्यक्ष देविदास महाजन, राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर, कृउबा सभापती रवींद्र महाजन, दशरथ महाजन, रमेश महाजन, भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, पं.स. सदस्य अनिल महाजन, नगरसेवक प्रा. मनोज पाटील, कृणाल महाजन, योगेश महाजन, बबलू चौधरी, गुजर समाजाचे अध्यक्ष गोपाल पाटील, प्रा. शिवाजीराव अहिरराव यांचेसह सर्व राजकीय, सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी तसेच महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थानच्या वतीने उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थानच्या पदाधिकार्‍यांनी तसेच गजानन परिवारातील सदस्यांनी सहकार्य केले. यावेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.