सेक्स आणि शराब हे आजचा स्त्रीच्या अत्याचाराचे मूळ आहे. आमच्या बालपणातील भारत काही निराळाच होता. म्हणूनच राहून राहून वाटते बालपणाचे दिवस सुखाचे, आठवती घडी घडी. पालकांचा, शिक्षकांचा आदर हा नैसर्गिकच वाटत असे. दारू पिण्याचे डोक्यातदेखील नव्हते, तर आज मुलांच्या पार्ट्या दारू पिल्याशिवाय पूर्ण होत नाही. दारूच्या नशेत आई-बहिणींच्या शरीरावर भुकेल्या लांडग्यासारखे बघू लागतात. मग ताळतंत्र सोडून त्यांच्या अंगावर हात घालू लागतात व भगिनींच्या अबू्रचे धिंडवडे उडवू लागतात, असे अनेक प्रकार भारतभर फोफाऊ लागले.
पण या स्थितीला जबाबदार सरकार आणि पोलीस तर आहेतच, पण समाजसुद्धा आहे. मला हे स्पष्टपणे यवतमाळ येथील मुलींवरील पोलीस अत्याचारात दिसले. पोलीस हे स्त्रियांचे रक्षणकर्ते नसून भक्षणकर्ते असल्याचे स्पष्ट जाणवले. त्याला सरकारही काहीच करू शकत नाही हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दाखवले. सृष्टी प्रवीण दिवटे, वय-21, यवतमाळ येथील रहिवासी. 27/08/2016 रोजी प्रवीण दत्तूजी दिवटे, तिचे दिवंगत वडील यांचा बंटी उर्फ आनंद जयस्वाल, विशाल दुबे, विक्की राय व अनेक लोकांनी डोळ्यात मिर्ची पावडर टाकून धारधार शस्त्राने तसेच 4 गोळ्या घालून अतिशय क्रूरपणे खून केला आहे. या सर्व घटनेची सृष्टी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. त्यानंतर पोलिसांनी सृष्टीच्या कुटुंबास त्रास देण्यास सुरुवात केली. आई आणि दोन बहिणीच कुटुंबात आहेत. त्यांच्यावर 307 सारखे खोटे गुन्हे दाखल केले. वास्तविक जखम असल्याशिवाय 307 कलम लावता येत नाही. तरी 17 वर्षांच्या श्वेताने पिस्तूल दाखवले म्हणून पोलिसांनी आरोपीच्या साथीदारांच्या तक्रारीवरून 307चे कलम त्यांच्यावर लावले. तिच्याकडे पिस्तूलच नाही. पोलीस वेळोवेळी आरोपींना मदत करत होते. मुली बाहेर गेल्या की गाडीला अडवणे, धमकावणे, घरासमोर येऊन शिट्या मारणे, उचलून घेऊन जाण्याची धमकी देणे, तुमचा कोपर्डी करू अशाप्रकारे मुलींवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, त्यांची तक्रारच पोलीस घेत नाहीत. त्यांना कोणाचाच आधार नाही. सर्व गुंड उत्तर भारतीय आहेत आणि भाजपचे लोक आहेत. शेवटी मुलींनी मला फोन केला. मी या मुलींना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना ओळखतदेखील नव्हतो. पण शिवरायांचा मावळा असल्यामुळे; कुणीही भगिनींनी हाक मारली तर धावून जातो.
11/07/2017 रोजी मी त्यांच्या घरी गेलो. माझ्या लक्षात आले की हे परप्रांतीय लोक मुलीचा घात करू शकतात. म्हणून तक्रार निवेदन घेऊन पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचेकडे गेलो व बोलणे केले, त्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी मला सांगितले की, मुलीबरोबर खासगी बोलायचे आहे. वास्तविक महिला पोलीस बरोबर असल्याशिवाय पोलिसांनी एकांतात मुलीबरोबर बोलायचे नसते. हा गुन्हा आहे. तरीदेखील चांगल्या भावनेने मी बाहेर गेलो. 2 बहिणींना तिथेच बसवून घेतले व पोलीस अधीक्षकाने अर्वाच्य भाषेत मुलींना धमकावले. तुम्ही शांत बसा, नाहीतर मी तुम्हा दोघींना जेलमध्ये पाठवेन, त्या आरोपीच्या नादाला लागू नका, ते लोक तुम्हाला जीवे मारतील अशा भाषेत मुलींचा अपमान केला व आरोपींची भीती दाखवली. एका खझड अधिकार्याने पोलिसांच्या वर्दीचा अपमान केला. यूपीचा पूर्ण गुंडाराज यवतमाळमध्ये उत्तर भारतीयांनी स्थापन केला आहे. मराठी माणूस मात्र घाबरून बसला आहे. आरोपींचा दारूचा व्यवसाय आहे. मी मुलींना घेऊन गृह राज्यमंत्री केसरकर आणि मुख्यमंत्र्यांकडे गेलो आणि मुलींना सुरक्षा देणे व पोलीस आणि अधीक्षकावर कडक कारवाई करण्यास आग्रह धरला आहे तसेच तपास उइख मार्फत करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तक्रार निवेदन सादर करूनदेखील काही कारवाई न झाल्यास आरोपी मुजोर होतील व मुलींच्या जीवितास व अब्रूस धोका निर्माण करतील हेदेखील मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. तरी आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी कुठलेच पाऊल उचलले नाही. यावरून त्यांची महिलाविषयीची मानसिकता स्पष्ट होते. म्हणून 6 ऑगस्टला यवतमाळ येथे पुढची दिशा ठरवण्यासाठी मी जात आहे.
निर्भया हत्याकांडानंतर, कायदा कडक केला, पण कोपर्डीसारखे प्रकार वाढतच आहेत. हातपाय कलम करणारा शिवराय पुन्हा केव्हा निर्माण होणार याची वाट सर्व अबला बघत असतील. पण तो कधीच निर्माण होणार नाही हे लक्षात ठेवा. आपले संरक्षण आपणच करायचे. आपणच आपल्या मुलींचे सामूहिक संरक्षण केले पाहिजे. कुणाचीही मुलगी किंवा स्त्री उचलावी अन् उपभोग घ्यावा, असे आज जंगलराज स्थापन झाले आहे. सर्व समाजातील संघटनांना माझे आवाहन आहे की, स्त्री सुरक्षा आणि सन्मान हेच एकमेव उद्दिष्ट ठेवा. जिजाऊ, ताराराणी, सावित्रीबाई, अहिल्याबाई, रमाबाई यांचा आदर्श बाळगून 6 ऑगस्ट 2017 ला यवतमाळ येथे स्त्री सन्मानाचा सामूहिक संकल्प करू.
ब्रि. सुधीर सावंत – 9987714929