सामोडे गावातील कन्हैयालालनगर भाग समस्यांच्या विळख्यात

0

पिंपळनेर । साक्री तालुक्यातील सामोडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कन्हैयालाल नगर हे अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. याकडे ग्रामपंचायतीचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. विशेष म्हणजे याच समस्यांच्या बाबतीत एक वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीला कन्हैयालाल नगर भागातील नागरिकांनी निवेदन दिले होते. यावर जिल्हा परिषद अध्यक्षांचे पुतणे व उपसरपंच या भागात राहण्यासाठी आले. त्यांनी त्यांच्या परिसरापुरती गटार व्यवस्था करुन घेतली. नागरिकांना मात्र वार्‍यांवर सोडून दिले. याच कन्हैयालाल नगर भागात गटारीची व्यवस्था नसल्याने अनेकजण संडासचे व सांडपाणी रस्त्यांवर व आजुबाजुला सोडून देतात. यामुळे दुर्गंधी पसरली आहे.

हेतुपुरस्सर दुर्लक्षचा आरोप
कन्हैयालाल नगर भागाच्या बाजुच्या नगरात मात्र सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. कन्हैयालाल नगर भागात दलित, आदिवासी व इतर समाजातील नागरिक राहत असल्याने आमच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे असे इथल्या नागरिकांत आप आपसात बोलले जात आहे. नागरिकांना गटारी, रस्ते, वीज बाबत असणार्‍या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात यासंदर्भाचे निवेदन सामोडे ग्रामपंचायतीला दिले आहे.

समस्या लवकर सोडवा
शौचालयाचे व सांडपाणी रस्त्यांवर सोडून देण्यात आल्याने परिसरात दुर्गेंधी सुटली आहे. पर्यायाने त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यांवर होतांना दिसत आहे. तरी कन्हैय्यानगर भागातील समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर प्रा. डॉ. सतीश मस्के, ईश्‍वर नेरकर, कैलास सुर्यवंशी, दुर्गादास पवार, सी. डी. साबळे व अर्चना विक्रम पवार आदींच्या सह्या आहेत.

रस्त्यांमध्ये खड्डे
याचबरोबर रस्त्यांची अवस्था तर फार वाईट झाली आहे. जागोजागी खडी उकरूनवर आल्याने खड्डे पडले आहेत. मुलांना शाळेत घेऊन जाणार्‍या रीक्षा चालकांना व मोटारसायकल चालवणार्‍यांना फार कसरत करावी लागत आहे. जीव मुठीत घेऊन वाहनं तर चालवावी लागतातच पण चालतांनाही खडीवर पाय तर घसरणार नाही ना! यासाठी काळजी घ्यावी लागते. वीजही अधूनमधून कमी जास्त होत असल्याने त्याचा परिणाम टी. व्ही, फ्रीज वर होताना जाणवतो आहे.