दोंडाईचा। ‘जगा आणि जगू द्या’ हाच मुलमंत्र भारतीय भुमीचा आजवर राहिलेला असुन जगातील सर्वच संस्कृतींचा भारताच्या मातीने सन्मान केलेला आहे. त्याच बरोबर भारताच्या स्वातंत्र्य आणि अस्तित्वावर प्रहार करण्याचा प्रयत्न करणार्या प्रत्येक आक्रमणाला भारतीयांनी प्रत्येक पिढीत चोख प्रत्युत्तर दिलेले आहे. अकबर प्रणित साम्राज्यवादाविरोधात समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेवुन अखंड 25 वर्षे जनयुध्द उभारून महाराणा प्रतापांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत जो लढा दिला तो जगाच्या इतिहासात सदैव स्मरणात राहील! साम्राज्यवादा विरोधात जनयुध्द उभारण्याची खरी प्रेरणा महाराणा प्रतापांनी जगाला दिली. असे प्रतिपादन राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंह यांच्या 477 व्या जयंती निमित्त दोंडाईचा येथील जाहीर व्याख्यानात प्रमुख वक्ता म्हणुन बोलतांना इतिहासाचे गाढे अभ्यासक जयपालसिंग गिरासे यांनी केले.
डोळे दिपवणारी रोषणाई : दोंडाईचा ता.शिंदखेडा येथे महाराणा प्रताप यांच्या 477 व्या जयंती निमित्त (दि.10) रोजी सकाळी मोटार सायकल रॅली व दुपारी 03 वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन महाराणा प्रताप उत्सव समितीच्या वतीने रावल नगर पासुन राम मंदीर पर्यंत करण्यात आले होते. या शोभायात्रेत नंदुरबार येथील बापुराव राजपूत यांनी महाराणा प्रतापांची वेशभुषा केलेली होती. रथावरील महाराणा प्रताप यांच्या वेशभुषेतील बापूराव राजपूत हे समारोहात खास आकर्षण होते. ढोल ताश्यांच्या गगनभेदी व घोड्यांच्या टाफांचा आवाज, मिरवणुकीतील देखावे व स्यंवसेवकांच्या कसरती व डोळे दिपवणारी रोषणाई लक्ष वेधुन घेत होती.
जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम : शोभायात्रेनंतर सायं 7 वाजता राम मंदिराच्या प्रागणांत शिरपुर येथील इतिहासाचे गाढे अभ्यासक जयपालसिंह गिरासे यांचा जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहादा-दोंडाईचा मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब रावल होते. तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणुन दैनिक पोलीस टुडे चे संपादक रत्नदिपसिंह सिसोदिया, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्षा चंद्रकला ताई सिसोदिया, नरेद्र गिरासे, जितेंद्र गिरासे, नगरसेवक नरेंद्र कोळी, निखिल जाधव, विरेंद्र गिरासे, राजेंद्र आर.गिरासे, प्रतापसिंह जमादार, बंटीभाऊ राजपूत, रवींद्र राजपुत, कृष्णपालसिंहजी गोहील राजकोट आदी उपस्थित होते.
उपस्थितांना केले मंत्रमुग्ध
यावेळी बापूसाहेब रावल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, आजच्या पिढीच्या युवकांनी महाराणाचे चरित्र वाचले पाहिजे. आणि त्यांनी घालुन दिलेले आदर्श जोपासले पाहीजेत. युवकांनी शौर्य आणि पराक्रमाची प्रेरणा महाराणापासुन घ्यावी. जर महाराणा प्रताप आणि छत्रपति शिवाजी महाराजासारखे महान योध्दे नसते तर देशाचा इतिहास आणि भुगोल हा वेगळा राहिला असता थोर पुरूष कुठल्याही एका समाजाचे नसुन ते राष्ट्राचे भुषण असतात असे बापूसाहेब रावल यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. तर श्री.जयपालसिंह गिरासे यांनी पुढे आपल्या व्याख्यानात महाराणा प्रतापांच्या जीवनातील त्याग- तप आणि बलिदानाच्या प्रसंगांचे वर्णन आपल्या ओघवत्या वाणीने करून त्यांनी श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे केले. सुमारे दीड तासाच्या व्याख्यानात त्यांनी महाराणा प्रतापांच्या संघर्ष गाथेचे वर्णन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.