सायकलवरुन करते जगभ्रमंती; कोल्हापूरातील ध्येयवेड्या तरुणीचा अनोखा ध्यास

0
तब्बल 29 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये आपला विक्रम नोंदविणार
55 दिवसात कापले 14 हजार 432 मीटर अंतर
पिंपरी : लहानपणी सर्वांनी सायकल चालवली असेल मात्र सायकलवरुन कोणीच जगभ्रमंती करण्याचे धाडस केले नसेल. कोल्हापूर येथील सायकलवेड्या 19 वर्षांच्या वेदांगीने ते धाडस करत अर्ध्या जगाची सायकलवरुन भ्रमंती पूर्ण केली आहे. केवळ 55 दिवसांमध्ये तीने 14 हजार 432 किलोमीटर अंतर कापले असून पुढील 50 ते 55 दिवसात 14 हजार किलोमीटर अंतर कापून ती एकून तब्बल 29 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये आपला विक्रम नोंदविणार आहे. वेदांगी विवेक कुलकर्णी ही 19 वर्षाची मुलगी कोल्हापूरमधील आहे. सध्या ती इंग्लंड येथील बोर्नमथ विद्यापीठात स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी वेदांगीने सायकल चालवण्यास सुरुवात केली. वेदांगीने आपल्या जगभ्रमंतीला ऑस्ट्रेलियाच्या पर्थ या शहरातून 17 जुलै  2018 पासून सुरुवात केली आहे. अ‍ॅडलेड 2800 किलोमीटर, मेलबर्न, सिडनी, ब्रिसबेन सहा हजार किलोमीटरचे अंतर कापून ती न्यूझीलंडला गेली. त्यानंतर वेलिंगटनचा 800 किलो मीटरचा प्रवास पूर्ण केला. 14 ऑगस्टला कॅनडामध्ये पोहचली. त्यानंतर ओटवा येथे गेली असून तिथे वेदांगीने 14 हजार किलोमीटर अंतर पूर्ण केले आहे.
भारतातील पहिली महिला
आज रविवार दि.16 रोजी ओटवातून वेदांगी सायकलवरुन हॅलीफेक्सीयाकडे रवाना होणार आहे. तेथून आर्यलंड, पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन, फिनलंड, रशिया असा एकूण तब्बल 29 हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमानुसार, वेदांगी जगातील सर्वात जलद सायकलवरून पृथ्वी प्रदक्षिणा करणारी सायकलस्वार ठरणार आहे. 29 हजार किलोमीटर अंतर वेदांगी केवळ 110 दिवसात पार करणार आहे. एवढा प्रवास करणारी वेदांगी भारतातील पहिली ठरणार असून जगातील तिसरी महिला ठरणार आहे.
कॅनडामध्ये जास्त वेळ लागला
याबाबत बोलताना तिचे वडील विवेक कुलकर्णी यांनी सांगितले की, वयाच्या 17 व्या वर्षी वेदांगीने सायकल चालवण्यास सुरुवात केली. दिवसाला 300 ते 350 किलोमीटर सायकल प्रवास एकटीने करत आहे. या यात्रेदरम्यान कॅनडा येथून प्रवास करणे सर्वात कठिण होते. अनेक घाट होते. त्यामुळे हे अंतर पार पाडण्यास अधिकचा वेळ लागला. अधिकचा लागलेला वेळ आणि अंतर कमी करण्यासाठी दुस-यादिवशी ती 350 पेक्षा जास्त किलोमीटर सायकल चालविते. 55 दिवसात तिने 14 हजार 432 किलोमीटर अंतर कापले आहे.  या प्रवासादरम्यान तिला अनेक अचडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु, धैर्याने त्यावर वेदांगी मात करत आहे.