सायकल मॅरेथॉनमधून भुसावळकरांनी दिला प्रदूषणमुक्तीचा संदेश

0

500 स्पर्धकांचा समावेश ; महिलांसह मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भुसावळ- रोटरी रेल सिटी भुसावळतर्फे रविवारी स्वच्छ भुसावळ, प्रदूषण मुक्त भुसावळसाठी सायक्लोथॉन स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तब्बल 500 भुसावळकरांनी सहभाग नोंदवला. नगराध्यक्ष रमण भोळे व माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी झेंडा दाखवून सायक्लोथॉन स्पर्धेचा शुभारंभ केृला. स्पर्धकांच्या अग्रभागी ज्येष्ठ रोटरी सदस्यांनी रोटरी ध्वज व तिरंगा हाती घेत लक्ष वेधले.

महिला व मुलांचा उत्स्फूर्त सहभाग
यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा, लोखंडी पूल , हेवन हॉटेल व त्याच मार्गे परत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान असा स्पर्धेचा मार्ग राहिला. या उपक्रमात भुसावळातील नामांकित डॉक्टर, वकील, व्यावसायीक, महिला व मुलांनी सहभाग नोंदवला. राठी सायकल मॉल, जळगाव व एटलस सायकल यांनी प्रायोजित केलेल्या दोन सायकल व सहा हेल्मेटचे लकी ड्रॉ काढून वितरण करण्यात आले. नेहा कुलकर्णी, डॉ.आसीफ शेख, कृष्णा अग्रवाल, विश्वेश फिरके, चिन्मय केळकर, चिराग कोळी आदींना सायकल हेल्मेट तर ईश्वर जाधव व जयेश बर्‍हाटे यांनी एटलसची सायकल जिंकली. सूत्रसंचालन संदीप सुरवाडे यांनी केले. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रोजेक्ट चेअरमन विशाल ठोके, अध्यक्ष महेंद्र (सोनू) मांडे , सेक्रेटरी डॉ.मकरंद चांदवडकर व सर्व रोटरी रेल सिटी सदस्यांनी परीश्रम घेतले.