सायकल योजनेचा समावेश ‘डीपी’मध्ये करा

0

शासनाच्या पालिकेला सूचना

पुणे : शहरातील सायकल योजनेला बळ देण्यासाठी एकात्मिक सायकल आराखड्याचा समावेश महापालिकेच्या विकास आराखड्यात (डीपी) करण्याच्या स्पष्ट सूचना राज्य सरकारने महापालिकेला दिल्या आहेत. त्यामुळे, शहरातील कोणकोणत्या मार्गांवर सायकल ट्रॅक निर्माण होणार आहेत, याची सविस्तर माहिती डीपीवर दर्शविण्यात येणार असून, हरकती-सूचना मागवून त्याचा अंतिम प्रस्ताव पुन्हा सरकारच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.

महापालिकेच्या एकात्मिक सायकल आराखड्याला सर्वसाधारण सभेने डिसेंबर 2017 मध्ये मंजुरी दिली. सायकल आराखड्यात नव्याने सायकल ट्रॅकच्या निर्मितीसह काही ठिकाणी सायकलींसाठी मुख्य रस्त्यावरच स्वतंत्र मार्गिका प्रस्तावित करण्यात आली होती. पुणे महापालिकेसह पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (पीएससीडीसी) यांनी शहरात विविध कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सायकली उपलब्ध करून दिल्या. त्याला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे, सायकल योजनेच्या आराखड्याचा समावेश विकास योजनेत करण्याची तयारी महापालिकेने केली होती. त्यासाठी, हरकतीसूचना मागविण्याची प्रक्रिया पूर्ण करून त्याचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सादर करण्याचे आदेश सरकारने महापालिकेला दिले आहेत.

ट्रॅकसाठी जागेची निर्मिती

महापालिकेच्या विकास आराखड्यात मेट्रोचे मार्ग निश्‍चित करण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर शहरात सायकल ट्रॅक कोणत्या मार्गावर असतील, याचे नियोजन सायकल आराखड्यात दर्शविण्यात आले आहे. हा आराखडाच आता विकास आराखड्यात समाविष्ट करण्यात येणार असल्याने सायकल ट्रॅकचे जाळे कोणकोणत्या भागांत असेल, याची माहिती नागरिकांना मिळू शकणार आहे. शहरातील रस्ते विकसीत करताना सायकल ट्रॅकसाठी जागा निर्माण केली जात असून, त्याची माहिती देण्यात येईल, असे पालिकेच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.