पुणे / चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील मल्ल विजय चौधरी याने पुण्याचा मल्ल अभिजित कटकेवचा गुणांवर परभाव करत सलग तिसर्यांदा महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब व चांदीची गदा पटकावली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचा मल्ल नरसिंग यादवनंतर अशी कामगिरी करणारा विजय चौधरी हा पहिलाच मल्ल ठरला आहे. दरम्यान, विजयच्या विजयानंतर चाळीसगावा तालुक्यात एकच जल्लोष करण्यात आला.
सचिन दोडके क्रीडा प्रतिष्ठानने आयोजिलेल्या या स्पर्धेला संपूर्ण राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र केसरीची गदा कोण जिंकणार, याकडे सर्व कुस्तीशौकिनांचे लक्ष लागले होते. (कै.) आमदार रमेशभाऊ वांजळे क्रीडानगरीच्या आखाड्यात लाल पोशाख परिधान केलेला अभिजित कटके, तर निळा पोशाख परिधान केलेला विजय चौधरी उतरला असता उपस्थित कुस्तीशौकिनांनी जल्लोष केला. दोन्ही मल्ल एकमेकांसमोर आल्यानंतर कोण बाजी मारेल, अशी हजारो प्रेक्षकांना उत्सुकता होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली.
सुरवातीलपासून विजय आक्रमक
यावेळी मोठा उलटफेर पाहावयास मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पुण्याच्या अभिजित कटकेने मोठा उलटफेर करत गादी विभागात लातूरच्या सागर बिराजदारची विजयी घोडदौड रोखत प्रथमच महाराष्ट्र केसरी गटात अंतिम फेरीत प्रवेश केला होता, तर माती विभागात विजय चौधरीने विलास डोईफोडेचे आव्हान सहज परतवून लावले. अभिजित कटकेने संपूर्ण स्पर्धेदरम्यान जोरदार खेळ केल्याने त्याच्याविषयीच्या आशा उंचावल्या होत्या. विजय चौधरीने सुरुवातीपासूनच खेळावर आपली पकड ठेवली. विजय व अभिजित यांनी सुरूवातीला एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेतला. त्यानंतर विजयने आक्रमकता दाखवत पहिला गुण वसूल केला. त्याने पट काढण्याचाही प्रयत्न केला. पहिला गुण पटकावल्यामुळे आत्मविश्वास आलेल्या विजयने आणखी आक्रमक होत दुसरा गुण पटकावत महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरले. विजय हा मातीवरचा मल्ल आहे. पण त्याने मॅटवरही उल्लेखनीय कामगिरी केली. विजयने आपला अनुभव पणाला लावत कटकेला खेळात परतण्याची कोणतीही संधी दिली नाही. 118 किलो वजनाच्या या दोन्ही मल्लांनी ही लढत तुल्यबळ अशी ठरवली आणि मोठ्या संख्येने जमलेल्या कुस्तीप्रेमींना आपल्या शक्ती आणि प्रतिभेचे दर्शन घडविले. 2014, 2015 आणि आता 2016 मध्ये महाराष्ट्र केसरीचा किताब आणि मानाची चांदीची गदा पटकविणारा विजय चौधरी हा महाराष्ट्राच्या कुस्तीच्या इतिहासातील दुसरा मल्ल ठरला आहे.
कुस्तीला सर्वतोपरी साह्य करू
कुस्ती ही आपली वैभवशाली परंपरा आहे. ही परंपरा पुढेही कायम राहिली पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्वतोपरी साह्य करण्यास तयार असून, आमचा पूर्ण पाठिंबा आहे. कोणत्याही वादाशिवाय ही स्पर्धा पार पडली, याचा मला आनंद होतो आहे, अशी प्रतिक्रिया राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.
सेल्फीसाठी गर्दी
कुस्ती पाहण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी गर्दी होतच असते. त्यात महाराष्ट्र केसरीसाठीची ही स्पर्धा असल्याने राज्याच्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून मल्ल, त्यांचे प्रशिक्षक व कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती. विजय चौधरी विजयी झाल्याचे घोषित झाल्यानंतर शौकिनांनी मॅटकडे धाव घेतली. तसेच, विजयबरोबर सेल्फी काढण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी झाली होती. बराच वेळ विजय याच शौकिनांच्या गराड्यात अडकला होता. विजयला मानाच्या चांदीच्या गदेबरोबरच बुलेटही भेट म्हणून देण्यात आली. त्याची चावीही यावेळी समारंभपूर्वक त्याला प्रदान करण्यात आली.