सायनासाठी कठीण, सिंधू, श्रीकांतसाठी सोपा पेपर

0

नवी दिल्ली । स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे 21 ऑगस्टपासून रंगणार्‍या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालची महिला एकेरी गटातील वाटचाल खडतर ठरू शकते. अन्य लढतींमध्ये रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि पुरूष एकेरीतील किंदबी श्रीकांतसाठी मात्र सायनाच्या तुलेनत सोपा पेपर असणार आहे. भारताचे आठ बॅडमिटंनपटूचे एकेरीच्या लढतींमध्ये आव्हान असणार आहे. त्यात पुरूष एकेरीत श्रीकांतच्या जोडीने अजय जयराम, साई प्रणिथ आणि समीर वर्माची विजेतेपदासाठी दावेदारी असेल. महिला गटात सिंधू, सायना नेहवाल, रितुपर्णा दास आणि तन्वी लाडचा समावेश आहे.

सायनाला स्पर्धेत 13 वे मानाकंन मिळाले असून स्पर्धेच्या निर्णायक फेरीत स्थान मिळवण्यासाठी तीला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. 2015 मधील जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकणार्‍या सायनाचा तिसर्‍या फेरीत दुसरे मानांकन मिळालेल्या सुंग जी ह्युनशी सामना होऊ शकतो. मात्र, सायनाची दक्षिण कोरियाच्या सुंगविरुद्ध चांगली कामगिरी असल्यामुळे त्या लढतीत सायनाला विजयाची पसंती मिळेल.

सायना आणि सुंग याआधी नऊवेळा आमनेसामने आल्या आहेत. त्यातील सात सामने सायनाने जिंकलेत तर दोन सामन्यांमध्ये सुंग विजयी झाली. पी.व्ही.सिंधूला पहिल्या सामन्यात बाय मिळाली आहे. दुसर्‍या फेरीत तिचा सामना कोरियाच्या किम हीओ मिन आणि इजिप्तच्या हादीया होस्नी यांच्या लढतीतील विजेत्याशी होईल. आठवे मानांकन श्रीकांतचा रशियाच्या सर्गेय सिरांतशी सामना होईल.