नवी दिल्ली । लंडन ऑलिम्पिकमधील पदकविजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवालने भविष्यातील ध्येय साधण्याच्या उद्देशाने पुन्हा माजी मार्गदर्शक पुलेला गोपीचंद यांच्या अकादमीत सराव करण्याचा निर्णय घेतला आहे. सायनाने आपल्या या निर्णयाची माहिती ट्विटरवर दिली आहे.
सायना म्हणाली की, माझ्या सरावाचे केंद्र गोपीचंद अकादमीत तयार करण्याचा विचार करत आहे. यासंदर्भात गोपीसरांशी चर्चा केली. मला मदत करण्याची त्यांना तयारी दर्शवली आहे. कारकिर्दीतल्या या टप्प्यावर माझे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांची मला मदत होऊ शकते. 27 वर्षीय सायनाने 2014 मध्ये इंचिओन आशियाई क्रीडा स्पर्धेआधी राष्ट्रीय मार्गदर्शक पुलेला गोपीचंद यांच्याऐवजी बंगळुरूत विमलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्याचा निर्णय घेतला होता. विमलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना सायनाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. याशिवाय जागतिक स्पर्धेत दोन पदके, 2015 मध्ये रौप्यपदक आणि 2017 मध्ये कांस्यपदके मिळवली होती. या ट्विटमध्ये सायनाने विमलकुमार यांचेही आभार मानले आहेत.