सायना, सिंधूवर मदार

0

नवी दिल्ली । यंदाच्या हंगामात चार सुपर सिरिज विजेतेपदं मिळवणारा आणि जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असणार्‍या किदंबी श्रीकांतने 14 ते 19 नोव्हेंबर दरम्यान होणार्‍या चीन ओपन सुपर सिरिज स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे आता स्पर्धेत भारताची पूर्ण मदार महिला क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असणार्‍या पी व्ही सिंधू आणि नवीन राष्ट्रीय विजेती सायना नेहवालवर असणार आहे.

स्पर्धेत श्रीकांतला आठवे मानाकंन मिळाले होते. पहिल्या फेरीत त्याचा सामना पात्रता फेरीतून मुख्य लढतींसाठी पात्र होणार्‍या खेळाडूशी होणार होता. पण नागपुरमध्ये झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान पायाला झालेल्या दुखापतीमुळे श्रीकांतने स्पर्धेतून अंग काढून घेतले. श्रीकांत आठवडाभर विश्रांती घेणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील अंतिम सामन्यात एच एस प्रणॉयने श्रीकांतला हरवले होते. चीन ओपन स्पर्धेतून बाहेर पडलेला श्रीकांत या स्पर्धेनंतर होणार्‍या हाँगकाँग ओपन स्पर्धेत खेळणार आहे. या सुपर सिरिज स्पर्धेत क्रमवारीतले अव्वल स्थान मिळवण्याची संधी श्रीकांतकडे आहे.