सायना, सिंधूसमोर वेगवेगळे आव्हान!

0

बर्मिंगहँग । पुढच्या महिन्यात सुरू होत असलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू या भारतीय खेळाडूंसमोर सलामीला वेगवेगळ्या प्रकारचे आव्हान आहे. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाला पहिल्या फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी तेई त्झु यिंग हिच्याशी झुंज द्यावी लागेल. तर रिओ ऑलिम्पिक रौप्यविजेत्या सिंधूसमोर सलामीला थायलंडच्या पोर्नपावी चोचुवांगचे तुलनेने सोपे आव्हान आहे. सायनाने 2015मध्ये ऑल इंग्लंड स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती तसेच गेल्या महिन्यात तिला इंडोनेशियन स्पर्धेत तेई त्झू यिंगकडूनच पराभव पत्करावा लागला होता. त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी सायनाला मिळणार आहे.

पुरुष एकेरीत तृतीय मानांकित किदंबी श्रीकांतसमोर सलामीला फ्रान्सच्या ब्राईस लीव्हर्डेझचे सोपे आव्हान आहे. परंतु बी. साईप्रणीथला पहिल्या फेरीत माजी जगज्जेत्या सोन वान हो या कोरियन खेळाडूशी झुंज द्यावी लागेल. तर एच. एस. प्रणयसमोर सलामीला आठवा मानांकित चोऊ तिएन चेनचे आव्हान आहे. पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी व सात्विकसाईराज रँकिरेड्डी या जोडीसमोर पहिल्या फेरीत ताकुरो होकी व युगो कोबायाशी या जपानी जोडीचे आव्हान आहे.