पिंपरी : महापालिकेच्या 105 शाळांमध्ये कायमस्वरुपी सायन्स सेंटर उभारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे. शिक्षण समितीने या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली आहे. शिक्षण विभागाच्या अखर्चित निधीतून हा निधी उभारला जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टरजवळ सायन्स सेंटर उभारण्यात आले आहे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, या उद्देशाने या सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये विज्ञानाचे अनोखे प्रयोग मांडण्यात आले आहेत. याला शहराबरोबरच शहराबाहेरील अनेक शाळांचे विद्यार्थी आवर्जून भेट देत आहेत. विद्यार्थ्यांना याठिकाणी ये-जा करणे सुलभ व्हावे, याकरिता सायन्स सेंटरमार्गे जाणार्या बस सेवा देखील उपलब्ध करुन देण्यात आली होती. महापालिकेच्या शहरात एकूण 105 शाळा आहेत. यामध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, याकरिता कायमस्वरुपी सायन्स सेंटर उभारण्याचा प्रस्ताव शिक्षण समितीने मंजूर केला आहे.