नवी मुंबई : नवी मुंबईत अवैध प्रवासी वाहतुकीचे प्रमाण वाढले असून हायवे व शहरात इतर ठिकाणी सुरू असणारी ही अवैध वाहतूक त्वरित बंद करण्याची मागणी प्रवासी वाहतूक संघटनांकडून केली जात आहे. सायन-पनवेल महामार्गावर वाशी, सानपाडा, नेरुळ, सीबीडीमध्ये एसटीच्या थांब्यावर प्रवासी घेण्यासाठी खासगी वाहने बिनधास्त उभी केली जात आहेत.
याबाबत प्रवासी संघटनांनी वारंवार आवाज उठवूनही वाहतूक विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. याचा फटका एसटी, एनएमएमटी यांना बसत आहे. वाहतूक शाखेने याकडे गांभीर्याने पाहून खासगी प्रवासी वाहतूक थांबवावी, अशी मागणी नागरिक आणि प्रवासी संघटनांकडून वारंवार करण्यात येत आहे.
सायन-पनवेल महामार्गावर कायमच प्रवासी आणि वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर छोट्या-छोट्या अंतरावर प्रवास करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला खासगी वाहने उभी असतात. कार, जीप व बस या खाजगी वाहनांमधून प्रवासी वाहतूक होत असते. वाहनांच्या क्षमतेपेक्षाही अधिक प्रवासी कोंबले जातात. यामुळे अनेकदा किरकोळ दुखापती होतात, तर जास्त प्रवासी मिळवण्यासाठी बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. यामधून काही वेळा खासगी वाहतूकदार आणि प्रवाशांमध्ये वादही होतात. महामार्गावरील बसथांब्याच्या समोरच ही वाहने उभी केल्याने परिवहनच्या बसेसनाही बसथांब्यासमोर वाहने उभी करता येत नाहीत. अनेकदा यामुळे वाहतूक कोंडी होत असते.
या मार्गांवरील खासगी वाहतूक प्रवाशांच्या दृष्टीने धोकादायक ठरत असल्याने बंद करावी, यासाठी विविध संघटनांनी आवाज उठवला; मात्र वाहतूक शाखा याकडे डोळेझाक करीत असल्याने वाहतूकदारांचे फावले आहे. एसटी, एनएमएमटी, रिक्षा यांना याचा मोठा फटका बसत आहे. परिवहनकडून काही वेळा या खासगी वाहतूकदारांवर कारवाई केली जाते; मात्र पुन्हा काही दिवसांत वाहतूक सुरू होते. अशा वाहतूकदारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.
अवैध प्रवासी वाहतुकीमुळे प्रवाशांना लुटणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. मध्यरात्री एकट्या प्रवाशाला गाठून त्याला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्याच्याकडील पैसे व इतर ऐवज लुटला जात आहे. हायवेवर लुटमारी करण्यासाठी दिल्लीसह अन्य परराज्यातून चोरटे मुंबई, नवी मुंबईत येत असल्याचे यापूर्वी पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे बेस्ट, एनएमएमटी, व एसटीच्या उत्पन्नावरही परिणाम होऊ लागला आहे.