सायबर गुन्हेगारीचे आव्हान

0

सोशल मीडियामुळे मानवी समुदाय एकमेकांच्या जवळ आला आहे. अनेकांना स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्याचे कार्य सोशल मीडियाने केले आहे. या नवमाध्यमाचा खूप मोठा फायदा आज सर्व अनुभवत आहे. याचा फायदा जितका आहे तितका तोटाही आहे. सोशल मीडियाच्या वापरातून आज नवनवीन गुन्हे समोर येत आहे. नवमाध्यमाचा वापर करून घडणार्‍या गुन्हेगारीस सायबर गुन्हेगारी म्हणून ओळखले जाते. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आले आहे. स्मार्ट फोनमुळे जीवनमानात बदल झाले. परंतु, हेच स्मार्ट फोन आज सायबर गुन्हेगारीस प्रोत्साहन देत आहे. तरुणाई यांच्या विळख्यात अधिक अडकली आहे. सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याने सरकारपुढेदेखील ते रोखाने आव्हानात्मक ठरत आहे. पोलीस प्रशासन यावर लक्ष केंद्रित करून असते. मात्र, हे गुन्हे काही कमी होताना दिसत नाही. सायबर हल्ले हा नवीन प्रकार आता समोर आला आहे. एखाद्या व्यक्तीच्या खासगी आयुष्यात सायबर गुन्हेगार ढवळाढवळ करत आहे. त्यामुळे खासगी आयुष्य धोक्यात आले आहे. यास आला घालण्यासाठी पोलीस प्रशासन अथक परिश्रम घेत आहे. मात्र, या गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच आहे.

2012 मध्ये 351, 2013 मध्ये 562, 2014 मध्ये 786, 2015 मध्ये 777, 2016 मध्ये 791 तर 2017 मध्ये 1037 जणांवर सायबर गुन्हेगारी अंतर्गत कारवाई झाली आहे. म्हणजे आकडेवारी वाढतच चालली आहे. 2016 च्या अहवालानुसार 2380 सायबर गुन्हे घडल्याची बाब निदर्शनात आले आहे. त्यातही सायबर गुन्ह्यात संशयित आरोपींवर कारवाई होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. गेल्या काही वर्षांत केवळ 1 टक्क्यापेक्षा कमी आरोपींवर कारवाई झाली आहे. महाराष्ट्रातील गुन्हेगारीची आकडेवारी दर्शवणार्‍या पुस्तकात ही माहिती देण्यात आली आहे. राज्यात सायबर गुन्ह्यांना आला घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प राबवण्यात येत आहे. शासनाने विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर मुंबई यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. हे पथक नेहमी सायबर गुन्हेगारीवर लक्ष ठेवून असते. महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाच्या प्रथम टप्प्यात राज्यातील सर्व जिल्हा तसेच आयुक्तालय मिळून 47 ठिकाणी सायबर लॅब कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सदर सायबर लॅब यांना तपासणीसाठी आधुनिक यंत्रसामग्री पुरवण्यात येत आहे. सायबर गुन्ह्यांची उकल व सायबर तंत्रज्ञानाची तंत्रज्ञानाबाबत 138 अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. विधानपरिषदेत सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणाबाबत चर्चा करण्यात आली. यात शासन करत असलेल्या उपाय योजनांची माहिती देण्यात आली. शासन गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना राबवत आहेत. मात्र, त्यात काही यश येत नसल्याचे दिसते. वाढत्या आकडेवारीवरून हे सिद्ध होते. महानगरीय शहरात सायबर गुन्हेगारीत अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येते. बाहेरील राज्यामधून येणार्‍यांकडून अधिकचे गुन्हे घडतात हेदेखील समोर आले आहे. शासनासमोर सायबर गुन्हेगारी एक मोठे आव्हान आहे.

– प्रदीप चव्हाण
जनशक्ति, मुंबई
7767012208