सायबर गुन्ह्यांना बळी पडणार्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. सायबर गुन्हेगार नवनवीन क्लृप्त्यांचा वापर करून अधिकाधिक पैशांची लूट करतात. याबाबत पोलिस प्रशासनातर्फे विविध कार्यक्रम घेऊन जनजागृती करण्यात येत असते. तरी देखील नागरिक याचा शिकार होतात. काही दिवसांपूर्वीच जळगावातील एका डॉक्टराला देखील चोरट्यांनी माहिती विचारून पन्नास हजारांचा चुना लावला होता. त्यासोबतच इंटरनेटच्या माध्यमातून खातेदारांच्या खात्यावरून परस्पर पैसे काढण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये हे प्रमाण चिंताजनक आहे़ मोठमोठ्या ठिकाणी होत असलेल्या गुन्ह्यांचा प्रसार गावांमध्येही होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दाखल झालेल्या सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे.
मोबाईलवरून खोटे नाव सांगणे, बँकेच्या अधिकार्याचे नाव सांगून एटीएमचा नंबर मिळवणे, त्याद्वारे परस्पर पैसे काढले जातात. काही महिन्यात अशा प्रकारच्या घटना सलग घडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे ग्राहकांकडून वेळोवेळी पालन होत नाही. तसेच पोलिसांकडूनही सावधगिरीचे उपाय सुचवण्यात येतात़ त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
यावेळी सायबर गुन्ह्यांपासून सावधगिरी बाळगण्यासाठी सायबर कॅफेमधून किंवा ऑफिसमध्ये असताना इंटरनेटवर आपली वैयक्तिक माहिती, पत्ता, फोन नंबर देऊ नका, चॅट विंडोवर अशी माहिती टाकू नका, पासवर्ड बदलत रहा, तुमच्या किंवा तुमच्या नवर्याचा/ बायकोचा /मुलाचा/टोपणनावाचा पासवर्ड ठेवू नका, सर्व अकाऊंट्ससाठी एकच पासवर्ड ठेवू नका. नेहमी ओटीपी पिन विचारून लाखोंचा गंडा घालण्यात येतो. त्यामुळे कुणालाही ओटीपी पिन सांगू नये. याबाबत बँकेत जाऊनच खात्री करावी. सध्या सायबर गुन्ह्याबाबत पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत आहे. परंतू, जनजागृती करून देखील सुशिक्षित व्यक्ती देखील एकाद्या चोरट्याने बॅकेचा अधिकारी सांगून कॉल केल्यावर फसवला जातो. त्यामुळे असे फेक कॉल असल्यास तात्काळ बँक अधिकारी व पोलिसांशी संपर्क साधले गरजेचे आहे.
-सागर दुबे, जळगाव.