गाझियाबाद: आज भारतीय हवाईदलाचा ८८ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. हवाईदलाची ताकद आजच्या प्रात्यक्षिकांमधून दिसून आली. चित्तथरारक कसरतीने हवाईदल दिन साजरा करण्यात आला. दरम्यान यावेळी भारतीय हवाईदलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी हवाईदलाची क्षमता आणि आव्हान यावर भाष्य केले. “सध्या आपल्या देशाला आणि हवाईदलाला सायबर आणि ड्रोनचा धोका यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या आव्हानांचा सामना करतच जगातील सर्वोत्कृष्ट हवाई दल बनले पाहिजे,” असे मत हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी व्यक्त केले. हवाईदल दिनानिमित्त गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. आपल्या संस्कृतीत शांततेला महत्त्व आहे आणि शांतता कायम ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.
एलएसीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाईदल प्रमुखांनी चीनला कठोर शब्दात संदेश दिला. भदौरिया यांनी करोना काळात मोलाची कामगिरी बजावणार्या योद्धांचेही यावेळी कौतुक केले.
येणारे दशक आव्हानात्मक आहे. आम्हाला सायबर हल्ला, ड्रोनद्वारे पाळत ठेवणं यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. परंतु नेहमीप्रमाणएच हवाईदल प्रत्येक आव्हानासाठी स्वतःला तयार करत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र, रोहिणी रडार, तेजस विमान आणि आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा भारतीय तंत्रज्ञानानं तयार केली गेली आहे. तसंच भारतीय तंत्रज्ञानाने विकसित केलेली विमानं आणि क्षेपणास्त्र यंत्रणा आगामी काळात हवाई दलाचा भाग बनतील. नेटवर्क सपोर्ट विमानं ही आता भारतीय हवाई दलाचा भाग आहेत आणि यामुळे हवाई दलाची ताकद वाढली आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतीय हवाईदल पूर्णपणे पेपरलेस बनविण्याचे लक्ष्य आहे. तीन सैन्याच्या समन्वयासाठी संरक्षण संरक्षण प्रमुखांची नेमणूकही उत्तम असल्याचे ते म्हणाले.